ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉक डाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत दिल्लीत लॉक डाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही असे म्हटले आहे . ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, बऱ्याच लोकांना असे वाटत आहे की, दिल्लीत अजून लॉक डाऊन वाढवला जाईल. पण अशी कोणतीही योजना नाही आहे.
दरम्यान, रविवारी दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच 2,224 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 41 हजार पेक्षा पुढे गेली होती. तर आतापर्यंत 1327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकार समोर मोठे आव्हान आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आधी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी देखील लॉक डाऊन वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या महामारीला रोखण्यासाठी आताच्या परिस्थितीत टेस्ट वाढवण्यावर भर दिला जात आहे.