ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खबरदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत वाढते कोरोनाबाधित आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यांतर्गत शनिवारी आणि रविवारी दिल्ली पूर्णपणे बंद राहणार आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.
सर्व आवश्यक सेवा वगळता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱयांना घरातून काम करण्यास सांगितले जाणार आहे. तर खासगी कार्यालये देखील 50 टक्के क्षमतेसह काम करतील असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट वाढून 6.46 टक्के झाला आहे.
राजधानीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे कारण ओमिक्रॉन व्हेरियंट आहे. रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या वाढल्यास आणखीन निर्बंध लादले जाऊ शकतात असे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे.
लोक लवकर बरे होत असले तरीही धोका आहेच. होम आयसोलेशन आवश्यक आहे, वाढती रुग्णसंख्या पाहता नियंत्रण आवश्यक आहे. याचमुळे राजधानी क्षेत्रात वीकेंड कर्फ्यू लागू केल्याचे सिसोदिया म्हणाले.
ओमिक्रॉन बाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणे नाहीत. तसेच ते लवकर बरे होत आहेत. ऑक्सिजन पातळी कमी होत असेल तरच रुग्णालयात धाव घ्या असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.