नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असे केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत, असेही त्यांनी जाहीर केले. कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचे नमूद करत निर्बंध शिथिल केल्यानंतरही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.