चित्रपटगृहात स्वतःच विकू लागला ‘रुही’ची तिकीटे
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट ‘रुही’ गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला आहे. टाळेबंदीनंतर चित्रपटगृहात 100 टक्के बुकिंगसह हे पहिलेच मोठे प्रदर्शन आहे. अशा स्थितीत स्वतःच्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता राजकुमार रावने वेगळीच शक्कल लढविली आहे. दिल्लीत एका मल्टिप्लेक्सच्या काउंटरवर तिकीट प्रदान करताना राजकुमार दिसून आला आहे. यादरम्यान अभिनेत्याने चाहत्यांशी संवाद साधला आहे.
चाहत्यांचा उत्साह द्विगुणित
चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेल्या चाहत्यांचा उत्साह राजकुमारला पाहून द्विगुणित झाला आहे. तर अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी झाल्याने तिकीटांची विक्रीही मोठय़ा प्रमाणात झाली आहे.
चित्रपटाला उत्तम प्रतिसाद
रुही चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी बाहेर पडलेले प्रेक्षकही उत्तम अशी दाद देत आहेत. कोरोना संक्रमणामुळे दीर्घकाळ बॉक्स ऑफिसचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता, अशा स्थितीत रुहीच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.