- सुरक्षा यंत्रणेकडून पोलिसांना सतर्कतेचा इशारा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्टच्या अगोदर दिल्ली पोलिसांना भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून राजधानी दिल्लीवर ड्रोनच्या सहाय्याने दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या सहाय्याने देशाच्या राजधानीला हादरवून टाकण्याचा कट असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. तसेच यंदा चार अँटी ड्रोन सिस्टम लाल किल्ल्यावर लावण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी दोन अँटी ड्रोन सिस्टमचा वापर करण्यात आला होता.
5 ऑगस्ट रोजी जम्मू – काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आला होता. त्यामुळे यंदा याच तारखेला हल्ल्याची दाट शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून वर्तवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी करताना दिल्ली पोलिसांनी ‘फ्लाईंग ऑब्जेक्ट’ उडवण्यावर बंदी घातली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
- दिल्ली पोलिसांना विशेष ट्रेनिंग
ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पहिल्यांदाच दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली आहे. यामध्ये ‘सॉफ्ट किल’ आणि ‘हार्ड किल’ या दोन्ही प्रकाराचा समावेश आहे. सामान्य ड्रोन दिसले तर ‘सॉफ्ट किल’ आणि संशयित ड्रोन किंवा हवेत उडणारी वस्तू दिसली तर ‘हार्ड किल’चा वापर करण्यात येतो.
ड्रोन हल्ल्यांची शक्यता वाढल्याने भारतीय हवाई दलाकडून एक विशेष ड्रोन कंट्रोल रुमही उभारण्यात आला आहे.