ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे की त्यांच्याकडे बेड उपलब्ध नाही तर दुसरीकडे, कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिल्लीत ही संख्या 27 हजार पेक्षा अधिक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीत 1320 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 27 हजार 654 वर पोहचला आहे. तर कालच्या दिवसात 349 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालच्या 349 रुग्णांची भर पडल्याने राजधानीत आत्तापर्यंत 10 हजार 664 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 761 लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या दिल्लीत 16,229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 9 दिवसात 11 हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक 83 हजार, त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजार पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर देशाची राजधानी दिल्ली तिसऱ्या स्थानावर तर गुजरात व राजस्थान अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.