काही क्षणात नाल्यात वाहून गेली झोपडीवजा घरे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या विविध भागांमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली होती. पावसाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे झोपडपट्टीवजा घरे वाहून गेल्याचे दिसून येत आहे. नाल्याजवळील एक दुमजली इमारतही कोसळली आहे. मात्र, दुर्घटनेवेळी या घरांमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे. दिल्लीतील अण्णानगर परिसरातील ही घटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिल्लीत शनिवारपासून पावसाचा कहर सुरू आहे. अण्णानगर येथे रविवारी पावसामुळे झोपडपट्टीत पाणी शिरले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बरीच घरे वाहून गेली. तसेच सकाळपासून दिल्लीत सतत पडणाऱया पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने लोक त्रस्त झाले आहेत. पुरामुळे रस्ते ठप्प झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. मुसळधार झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी भरले आहे. प्रसिद्ध मिंटो ब्रिजखालीही पाणी साचले होते. याच ब्रिजच्या खाली एक मृतदेह सापडला असून तो एका पिकअप चालकाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.