ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत सुरू असलेले लॉकडाऊन 7 जून च्या पहाटे 5 वाजेपर्यंत जारी असेल आणि यासोबतच अनलॉकची प्रकिया देखील 7 जून म्हणजेच येत्या सोमवारपासून सुरु केली जाणार आहे. यामध्ये अनेक गोष्टी शिथिल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली.
याबाबत माहिती देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, कन्टोनमेंट झोन बाहेरील बाजार आणि मॉल्स सम – विषम योजनेनुसार सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सरकारी कार्यालयात ‘अ’ गटातील कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असेल. खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेट्रो 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास सांगितले आहे. या आठवड्यातील कोरोना रुग्णवाढीच्या दरावर पुढे काय सवलती द्यायची हे अवलंबून असेल असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीत मागील 24 तासात 400 नवे रुग्ण आढळून आले. यासोबतच संसर्ग दरात देखील घट झाली असून सद्य स्थितीत हा दर 0.5 टक्के इतका आहे. यावरून असे दिसते आहे की, राजधानीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेे. पुढे केजरीवाल म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढाईत दिल्लीवासियांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आता बिघडलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- तिसऱ्या लाटेसाठी दिल्ली सरकार सज्ज
तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधून दिल्ली सरकारने तयारी सुरु केली आहे. दिल्लीत प्रतिदिन 37 हजार रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज समोर ठेवून रणनिती आखण्यात आली आहे. बेड, ऑक्सिजन, औषधे आणि आयसीयू याची तयारी केली जात आहे. लहान मुलांना कोरोनाची बाधा होईल असे तज्ज्ञांनी सांगितल्याने मुलांसाठी आयूसीयू बेडचे प्रयोजन देखील केले जात आहे. त्याचबरोबर 420 टन ऑक्सिजनसाठी स्टोरेज तयार करण्यात येत आहे, असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.