निविदा प्रक्रियेस प्रारंभ : प्रवासाचा कालावधी घटणार : 459 किमी लांबीचा कॉरिडॉर, चेन्नई-बेंगळूर मार्गाचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली आणि अमृतसर या शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) याकरता ऑनलाईन ई-निविदा मागविल्या आहेत. अलाइनमेंट डिझाइन, हवाई एलआयडीएआर सर्वेक्षण आणि अन्य पायाभूत संबंधी कार्यांसाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत.
या जलदगती रेल्वे मार्गिकेची एकूण लांबी 459 किलोमीटर असणार आहे. या हायस्पीड कॉरिडॉरमुळे दिल्ली आणि अमृतसरमधील प्रवासाचा कालावधी घटणार आहे. 28 डिसेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी निविदा सादर करता येणार आहे. तर 29 डिसेंबर रोजी निविदांची छाननी करण्यात येणार आहे.
10 मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार
भारतीय रेल्वे देशात 10 मार्गांवर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निर्मितीची योजना आखत आहे. यातील 6 रेल्वे कॉरिडॉर दिल्लीतून सुरू होणार आहेत. दिल्लीहून मुंबई, कोलकाता, वाराणसी, भोपाळ, अमृतसर आणि अहमदाबाददरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची योजना आहे. याचबरोबर नागपूर-मुंबई, पाटणा-कोलकाता, चेन्नई-बेंगळूर आणि चेन्नई-म्हैसूरदरम्यान जलदगती रेल्वे धावू शकते.
2025-26 पर्यंत पूर्ततेचे लक्ष्य
या सर्व 10 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्सच्या पूर्ततेसाठी 2025-26 चे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या कॉरिडॉरची अनुमानित लांबी 6 हजार किलोमीटर असून त्याकरता सुमारे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते.
स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य
आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याचनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची 70 टक्क्यांपेक्षा अधिक कार्ये देशांतर्गत कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिली आहे.
तांत्रिक कार्याची जबाबदारी
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बहुतांश उच्चदर्जाचे तांत्रिक कार्य भारतीय कंपन्यांकडूनच केले जाणार आहे. तर जपानी कंपन्या सिग्नलिंग, दूरसंचार आणि रोलिंग स्टॉकशी संबंधित कार्य करणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेची लांबी 508 किलोमीटर असून याकरता 1.10 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यातील 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजेन्सीकडून (जायका) दिले जात आहे.