नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपमापन यंत्रावर या धक्क्याची तीव्रता 2.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू गुरुग्राम येथे होता. हा भूकंप दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. गेल्या काही दिवसात दिल्ली-एनसीआरमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, यावेळी भूकंपाची तीव्रता पूर्वीपेक्षा कमी होती. दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या एका महिन्यात पाचहून अधिकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यापैकी बहुतेकदा दिल्लीच्या आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. कोरोना साथीच्या काळात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लोकांमध्ये अधिक घबराट पसरत आहे. भूपृ÷भागाखाली लहान-मोठय़ा घडामोडी घडत असल्यामुळे कधी-कधी भूकंपाचे धक्के जाणवतात, असे स्पष्टीकरण नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे प्रमुख (ऑपरेशन्स) जे. एल. गौतम यांनी दिले आहे.