ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. आपत्कालीन विभागाजवळ तळमजल्यावर स्टोअर रुममध्ये ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.रुग्णालयात आग लागल्यानंतर सर्वात अगोदर रुग्णांना बाहेर काढण्यात आले. रुग्ण बाहेर उभे असताना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. या आगीमुळे कोणत्याही प्रकरची जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही. तर गंभीर रुग्णांना तात्काळ सफदरजंगमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही 17 जून रोजी देखील एम्स रुग्णालयात नवव्या मजल्यावर आग लागल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली होती.