ललित यादव-अक्षर पटेलची फटकेबाजी निर्णायक, कुलदीपचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
ललित यादव आणि अक्षर पटेलची यांनी केलेली जोरदार फटकेबाजीच्या बळावर आयपीएलमधील साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयी प्रारंभ करताना बलाढय़ मुंबई इंडियन्सला चार गडय़ांनी पराभवाचा धक्का दिला. ललितने 38 चेंडूत नाबाद 48 तर अक्षर पटेलने केवळ 17 चेंडूत नाबाद 38 धावा झोडपल्या. 18 धावांत 3 बळी मिळविणाऱया दिल्लीच्या कुलदीप यादवला सामनावीराचा बहुमान मिळाला.
मुंबई इंडियन्सच्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची स्थिती दहाव्या षटकातच 5 बाद 72 अशी झाली होती. पण दिल्लीच्या फारसा परिचित नसलेल्या ललित यादवने आजवरची सर्वोत्तम खेळी करताना 38 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याला अष्टपैलू अक्षर पटेलनेही 17 चेंडूत नाबाद 38 फटकावत पूरक साथ दिल्याने 10 चेंडू बाकी असताना दिल्लीचा विजय साकार झाला. यादवने आपल्या खेळी 4 चौकार, 2 षटकार तर पटेलने 2 चौकार, 3 षटकार मारले. या दोघांनी सातव्या गडय़ासाठी 30 चेंडूत 75 धावांची अभेद्य भागीदारी केली. पृथ्वी शॉ (38), कर्णधार रिषभ पंत (1), रोवमन पॉवेल (0) स्वस्तात बाद झाले असले तरी मुंबईचा वेगवान मारा फारसा प्रभावी ठरला नाही. बुमराहने 43 धावा दिल्या. पण त्याला एकही बळी मिळविता आला नाही. याशिवाय मुंबईचे क्षेत्ररक्षणही खराब झाले. पटेल 15 धावांवर असताना डॅनियल सॅम्सने त्याला जीवदान दिले. सॅम्सनेही 18 व्या षटकात 24 धावा दिल्या. यादवने त्याला या षटकात 4 चौकार व एक षटकार मारला. पटेलने षटकार ठोकून विजय साजरा केला. प्रारंभी शॉ व सीफर्ट यांनी जलद सुरुवात करून देताना 3 षटकांतच 30 धावा फटकावल्या. पण बसिल थम्पीने शॉ, पॉवेल व शार्दुल ठाकुर यांचे बळी मिळवित दिल्लीला बॅकफूटवर आणले होते. याशिवाय मुरुगन अश्विनने 2 व टायमल मिल्सने 1 बळी मिळविला.
इशान किशनचे नाबाद अर्धशतक
तत्पूर्वी, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने नाबाद 81 धावांची खेळी करीत मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 5 बाद 177 धावांची मजल मारून दिली. या 23 वर्षीय सलामीवीराने 48 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार फटकावले. प्रारंभीच्या पॉवरप्लेच्या षटकांत त्याने दुय्यम भूमिका घेत कर्णधार रोहितला जादा स्ट्राईक दिला. नवव्या षटकात रोहित (32 चेंडूत 41) बाद झाल्यानंतर इशानने ताबा घेत मुंबई इंडियन्ससाठी सलग तिसरे व एकूण दहावे अर्धशतक नोंदवले. मधल्या षटकांत कुलदीप यादवने मुंबईच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने केवळ 18 धावा देत 3 बळी मिळविले. त्यात रोहित शर्मा व पोलार्ड (3) यांचा समावेश आहे. दुसऱया बाजूने विकेट्स पडत असल्या तरी इशानने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करीत संघाला पावणेदोनशेची मजल मारून दिली. मुंबईने शेवटच्या पाच षटकांत 59 धावा झोडपल्या. मुंबईतर्फे पदार्पण करणाऱया तिलक वर्मानेही 15 चेंडूत 22 धावांची भर घातली. याशिवाय टिम डेव्हिडने 8 चेंडूत 12, सॅम्सने 2 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 7 धावा काढल्या. कुलदीप यादवशिवाय खलील अहमदने 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 177 ः रोहित शर्मा 41 (32 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), इशान किशन नाबाद 81 (48 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), अनमोलप्रीत सिंग 8, तिलक वर्मा 22 (15 चेंडूत 3 चौकार), पोलार्ड 3, टिम डेव्हिड 12 (8 चेंडूत 1 षटकार), सॅम्स नाबाद 7 (2 चेंडूत 1 षटकार), अवांतर 3. गोलंदाजी ः कुलदीप यादव 3-18, खलील अहमद 2-27. दिल्ली कॅपिटल्स 18.2 षटकांत 6 बाद 179 ः पृथ्वी शॉ 38 (24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), सीफर्ट 21 (14 चेंडूत 4 चौकार), मनदीप सिंग 0, पंत 1, ललित यादव नाबाद 48 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), पॉवेल 0, शार्दुल ठाकुर 22 (11 चेंडूत 4 चौकार), अक्षर पटेल नाबाद 38 (17 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), अवांतर 11. गोलंदाजी ः बसिल थम्पी 3-35, मुरुगन अश्विन 2-14, टायमल मिल्स 1-26