वृत्तसंस्था/ मुंबई
महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 60 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल संघातील तारा नोरीसची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीने 20 षटकात 2 बाद 223 धावा जमवल्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 8 बाद 163 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
दिल्लीच्या डावात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत 14.3 षटकात 162 धावांची दीडशतकी भागीदारी केली. बेंगळूरच्या गोलंदाजांना 15 व्या षटकात ही जोडी फोडण्यात यश मिळाले. नाईटने कर्णधार लेनिंगचा त्रिफळा उडवला. तिने 43 चेंडूत 14 चौकारासह 72 धावा झोडपल्या. त्यानंतर पाठोपाठ शेफाली वर्मा नाईटच्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाली. शेफालीने 45 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारासह 84 धावा झोडपल्या. कॅपने 17 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 39 तर रॉड्रीग्जने 15 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 22 धावा झळकवल्या. कॅप आणि रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 5.1 षटकात अभेद्य 60 धावांची भर घातली. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 7 षटकार आणि 30 चौकार नोंदवले गेले. बेंगळूरतर्फे नाईटने 40 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावात कर्णधार स्मृती मानधनाने 23 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 35, सोफी डिव्हाईनने 11 चेंडूत 3 चौकारासह 14, इलिसी पेरीने 19 चेंडूत 5 चौकारासह 31, रिचा घोषने 2, हिथेर नाईटने 21 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 34, मेगान स्कूटने 19 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 30 धावा जमवल्या. बेंगळूरच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. दिल्लीतर्फे तारा नोरीसने आपल्या 4 षटकात 29 धावांच्या मोबदल्यात 5 बळी घेतले. कॅप्से 10 धावात 2 तसेच शिखा पांडेने 35 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 2 बाद 223 (लेनिंग 72, शेफाली वर्मा 84, एम. कॅप नाबाद 39, रॉड्रिग्ज नाबाद 22, नाईट 2-40), रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 8 बाद 163 (स्मृती मानधना 35, डिव्हाईन 14, इलिसी पेरी 31, नाईट 34, स्कूट नाबाद 30, तारा नोरीस 5-29, कॅप्से 2-10, शिखा पांडे 1-35).