स्टोईनिस-शिखर धवनची 86 धावांची सलामी, हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई
वृत्तसंस्था/ अबु धाबी
डावखुरा फलंदाज शिखर धवनचे (50 चेंडूत 78) झुंझार अर्धशतक व हेतमेयर (22 चेंडूत नाबाद 42), स्टोईनिस (27 चेंडूत 38) यांच्या फटकेबाजीमुळे येथील दुसऱया व शेवटच्या क्वॉलिफायर लढतीत दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. प्रारंभी त्यांनी 3 बाद 189 धावांचा डोंगर रचला आणि सनरायजर्सला 8 बाद 172 धावांवर रोखून धरले. हैदराबादच्या जवळपास सर्वच गोलंदाजांची येथे धुलाई झाली. धवन-स्टोईनिसची 8.2 षटकातील 86 धावांची सलामी, हे दिल्लीच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.
विजयासाठी 190 धावांचे कठीण आव्हान असताना हैदराबादतर्फे केन विल्यम्सनने 45 चेंडूत 67 धावांची आतषबाजी केली तर समदने 16 चेंडूत जलद 33 धावा फटकावल्या. मात्र, निर्णायक टप्प्यात फटकेबाजीची आवश्यकता असताना त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले अािण येथून विजय त्यांच्या हातातून निसटत राहिला. दिल्लीतर्फे जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाने 29 धावात 4 बळी घेतले. या स्पर्धेतील जेतेपदाची लढत आता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात उद्या (मंगळवार, दि. 10) होईल.
दिल्लीतर्फे धवनची फटकेबाजी
प्रारंभी, धवनने 78 धावांच्या खेळीत 6 चौकार व 2 षटकार तर हेतमेयरच्या नाबाद 42 धावांच्या खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. कर्णधार श्रेयस अय्यरने 20 चेंडूत 21 धावा केल्या तर ऋषभ पंत 3 चेंडूत 2 धावांवर नाबाद राहिला.
पॉवर प्लेमध्ये 65 धावांची आतषबाजी
या लढतीत, दिल्लीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि स्टोईनिस व शिखर धवन या अनुभवी जोडीने पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकात बिनबाद 65 धावांची आतषबाजी करत हा निर्णय पहिल्या टप्प्यात सार्थ ठरवला. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पृथ्वी शॉला दिल्लीने या लढतीतून वगळले आणि हा निर्णय देखील त्यांच्या पथ्यावरच पडला.
स्टोईनिसने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला तर शिखर धवनने देखील त्याला पूरक साथ दिली.
संदीप शर्माच्या पहिल्या षटकात सावध पवित्र्यावर भर दिल्यानंतर दुसऱया षटकापासून या जोडीने फटकेबाजीला प्रारंभ केला. होल्डरच्या दुसऱया षटकात 8 तर संदीपच्या तिसऱया षटकात 10 धावा वसूल करत या उभयतांनी आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. अर्थात, संदीपच्या षटकात स्टोईनिसला महत्त्वाचे जीवदान मिळाले.
स्टोईनिसला जीवदान
तसे पाहता, स्टोईनिस इनस्विंगरवर उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात जवळपास चकलाच होता. पण, सिली मिडऑनच्या उजव्या बाजूला वळत होल्डरला झेल पूर्ण करता आला नाही आणि स्टोईनिससारखा अव्वल फलंदाज बचावला.
त्यानंतर होल्डरचे चौथे षटक दिल्लीसाठी अधिक फलद्रुप ठरले. या षटकात दिल्लीने 18 धावा वसूल केल्या आणि या सर्व धावा स्टोईनिसच्या बॅटीतूनच बरसत राहिल्या. स्टोईनिसने या षटकात 3 चौकार व 1 षटकार फटकावत एकूण 18 धावांची आतषबाजी
केली.
दुसऱया बाजूने डावखुऱया धवनने देखील फटकेबाजी सुरु केली. शॉर्ट फाईन लेगवर टी. नटराजनच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे त्याच्या खात्यावर चौकार जमा झाला आणि नंतर त्याने अधिक आक्रमक खेळ साकारण्यावर लक्ष केंद्रित केले. 6 व्या षटकात धवनने षटकार खेचल्यानंतर नदीमला नोबॉलमुळे फ्री हिटची नामुष्की स्वीकारावी लागली. पण, त्याच्या सुदैवाने या फ्री हिटवर धवनला केवळ एकच धाव घेता आली. 7 व्या षटकात ओव्हरथ्रोच्या 4 धावांचा लाभ दिल्लीच्या खात्यात नोंदवला गेला होता.
दिल्लीच्या सलामीवीरांनी 2 धावा घेतल्या होत्या. त्यानंतर रशीदने डीपमधून आलेला चेंडू कलेक्ट करत जोरदार थ्रो केला आणि चेंडू थेट सीमारेषा पार करुन गेला.
9 व्या षटकात पहिले यश
अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानने अखेर 9 व्या षटकात स्टोईनिसला बाद करत सनरायजर्स हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. स्टोईनिसने ऍक्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि यात अंदाज चुकल्यानंतर त्याला त्रिफळाचीत होत परतावे लागले. अर्थात, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 20 चेंडूत एका चौकारासह 21 धावा जमवल्या. मध्यम-जलद गोलंदाज जेसॉन होल्डरने पांडेकरवी त्याची खेळी संपुष्टात आणली. धवन व अय्यर जोडीने दुसऱया गडय़ासाठी 40 धावांची भागीदारी साकारली. अय्यर बाद झाल्यानंतरही धवनचा धडाका सुरुच राहिला.
19 व्या षटकात बाद होण्यापूर्वी धवनने अनुभव पणाला लावत चौफेर फटकेबाजी केली आणि सातत्याने हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या शिमरॉन हेतमेयरने तर आल्या पावलीच धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली आणि 22 चेंडूत जलद 42 धावा फटकावल्या. त्याच्या या धुवांधार खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. हेतमेयर 42 तर ऋषभ पंत 3 चेंडूत 2 धावांवर नाबाद राहिला. सनरायजर्स हैदराबादतर्फे संदीप शर्मा, जेसॉन होल्डर व रशीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : स्टोईनिस त्रि. गो. रशीद खान 38 (27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), शिखर धवन पायचीत गो. संदीप शर्मा 78 (50 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर झे. पांडे, गो. होल्डर 21 (20 चेंडूत 1 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 42 (22 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), ऋषभ पंत नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 3 बाद 189.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-86 (स्टोईनिस, 8.2), 2-126 (13.6), 3-178 (धवन, 18.3).
गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-30-1, जेसॉन होल्डर 4-0-50-1, शाहबाज नदीम 4-0-48-0, रशीद खान 4-0-26-1, टी. नटराजन 4-0-32-0.
सनरायजर्स हैदराबाद : प्रियम गर्ग त्रि. गो. स्टोईनिस 17 (12 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. रबाडा 2 (3 चेंडू), मनीष पांडे झे. नोर्त्जे, गो. स्टोईनिस 21 (14 चेंडूत 3 चौकार), केन विल्यम्सन झे. रबाडा, गो. स्टोईनिस 67 (45 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), जेसॉन होल्डर झे. दुबे, गो. पटेल 11 (15 चेंडूत 1 चौकार), अब्दुल समद झे. बदली खेळाडू (पॉल), गो. रबाडा 33 (16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रशीद खान झे. पटेल, गो. रबाडा 11 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), गोस्वामी झे. स्टोईनिस, गो. रबाडा 0 (1 चेंडू), नदीम नाबाद 2 (3 चेंडू), संदीप शर्मा नाबाद 2 (4 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 8 बाद 172.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-12 (वॉर्नर, 1.1), 2-43 (गर्ग, 4.4), 3-44 (पांडे, 4.6), 4-90 (होल्डर, 11.4), 5-147 (विल्यम्सन, 16.5), 6-167 (समद, 18.3), 7-167 (रशीद, 18.4), 8-168 (गोस्वामी, 18.5).
गोलंदाजी : अश्विन 3-0-33-0, रबाडा 4-0-29-4, नोर्त्जे 4-0-36-0, स्टोईनिस 3-0-26-3, अक्षर पटेल 4-0-33-1, दुबे 2-0-14-0.