आयपीएल टी-20 सामना : दिल्लीच्या गोलंदाजांचा भेदक मारा निर्णायक, शेवटच्या षटकात 22 धावा जमवण्यात राजस्थानला अपयश
वृत्तसंस्था / दुबई
शिखर धवन (33 चेंडूत 57) व कर्णधार श्रेयस अय्यर (43 चेंडूत 53) यांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी मात दिली. तसेच गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली.
विजयासाठी 162 धावांचे आव्हान असताना राजस्थानतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 41 धावा केल्या तर याशिवाय बटलर (22), रॉबिन उत्थप्पा (32) यांनाच थोडीफार चमक दाखवता आली.
शेवटच्या षटकात राजस्थानला 22 धावा आवश्यक असताना पदार्पणवीर तुषार देशपांडेने अतिशय काटेकोर मारा केला आणि या बळावर दिल्ली कॅपिटल्सने 13 धावांनी सहज विजय संपादन केला. राहुल तेवातिया क्रीझवर असला तरी अपेक्षित फटकेबाजी करण्यात तो यशस्वी ठरला नाही. राजस्थानला विजयाची उत्तम संधी असतानाही ते याचा लाभ घेऊ शकले नाहीत.
शेवटच्या 2 षटकात विजयासाठी 25 धावांची गरज असताना रबाडाने अतिशय नियंत्रित, भेदक मारा करत केवळ तीनच धावा दिल्या होत्या. तेवातियाने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्यानंतर आर्चरने दोन चेंडू निर्धाव घालवले व पुढील चेंडूवर रहाणेकडे सोपा झेल दिला. शेवटच्या दोन चेंडूवर गोपाल व तेवातिया यांनी प्रत्येकी एक धाव घेतली होती.
या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर पृथ्वी शॉ गोल्डन डकचा मानकरी ठरल्याने दिल्लीला पहिल्याच टप्प्यात मोठा धक्का सोसावा लागला. जलद गोलंदाज आर्चरचा आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडू हलका ड्राईव्ह करण्याचा शॉचा प्रयत्न होता. मात्र, यात चेंडूने बॅटची आतील कड घेऊन यष्टी उद्ध्वस्त झाली आणि शॉसह दिल्ली संघाचीही निराशा झाली.
तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलेल्या अजिंक्य रहाणेने (9 चेंडूत 2) सलग दुसऱयांदा निराशा केली. आर्चरचा एक चेंडू स्लॉग करण्याच्या प्रयत्नात त्याचा अंदाज चुकला आणि मिडऑनवरील उत्थप्पाने सोपा झेल टिपल्यानंतर रहाणेची खेळी संपुष्टात आली.
आघाडी फळीतील दोन अव्वल फलंदाज स्वस्तात गारद झाल्याने दिल्लीची 2.3 षटकातच 2 बाद 10 अशी दैना उडाली. मात्र, त्यानंतर डावखुरा शिखर धवन (33 चेंडूत 57) व कर्णधार श्रेयस अय्यर (43 चेंडूत 53) या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 75 धावांची दमदार भागीदारी साकारत डाव साकारण्याचा पूर्ण प्रयत्न केला. धवनच्या 33 चेंडूतील खेळीत 6 चौकार व 2 षटकार तर श्रेयसच्या 43 चेंडूतील खेळीत 3 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
डावातील 12 व्या षटकात गोपालने धवनला त्यागीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. यावेळी धवनचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्ण फसला होता.
चेंडू धवनच्या अपेक्षेपेक्षा अधिक उसळला आणि बॅटची कड घेत हवेत उंचावला. शॉर्ट थर्डमॅनवरील कार्तिक त्यागीने सहज झेल पूर्ण केल्यानंतर धवनची खेळी संपुष्टात आली. कर्णधार श्रेयस अय्यर डावातील 16 व्या षटकात कार्तिक त्यागीचा बळी ठरला. अय्यरने लाँगऑफवरील आर्चरकडे झेल दिला. दिल्लीने यावेळी 16 षटकात 4 बाद 132 धावा जमवल्या होत्या.
अर्थात, नंतर उर्वरित 4 षटकांच्या खेळात दिल्लीला केवळ 29 धावांची भर घालता आली आणि यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकात 7 बाद 161 धावांवर समाधान मानावे लागले. स्टोईनिसने आर्चरच्या गोलंदाजीवर तेवातियाकडे झेल देण्यापूर्वी 19 चेंडूत 18 धावा जमवल्या. ऍलेक्स कॅरेने 13 चेंडूत एका षटकारासह 14 धावा जमवल्या. पण, तो ही फटेकबाजीच्या प्रयत्नातच बाद झाला.
अक्षर पटेल (7) डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला तर अश्विन शून्यावर नाबाद राहिला.
गोलंदाजीच्या आघाडीवर राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने दिल्लीकर फलंदाजांना सातत्याने सतावत ठेवले. त्याने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना अवघ्या 19 धावांमध्ये पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे व स्टोईनिस असे तीन मोहरे टिपले. याशिवाय, जयदेव उनादकटने 3 षटकात 32 धावात 2 तर कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ त्रि. गो. आर्चर 0 (1 चेंडू), शिखर धवन झे. कार्तिक त्यागी, गो. गोपाल 57 (33 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), अजिंक्य रहाणे झे. उत्थप्पा, गो. आर्चर 2 (9 चेंडू), श्रेयस अय्यर झे. आर्चर, गो. कार्तिक त्यागी 53 (43 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), स्टोईनिस झे. तेवातिया, गो. आर्चर 18 (19 चेंडूत 1 चौकार), ऍलेक्स कॅरे झे. आर्चर, गो. उनादकट 14 (13 चेंडूत 1 षटकार), अक्षर पटेल झे. त्यागी, गो. उनादकट 7 (4 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 10. एकूण 20 षटकात
7 बाद 161.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (शॉ, 0.1), 2-10 (रहाणे, 2.3), 3-95 (धवन, 11.4), 4-132 (श्रेयस अय्यर, 15.6), 5-153 (स्टोईनिस, 18.6), 6-157 (कॅरे, 19.4), 7-161 (अक्षर, 19.6).
गोलंदाजी : जोफ्रा आर्चर 4-0-19-3, जयदेव उनादकट 3-0-32-2, कार्तिक त्यागी 4-0-30-1, बेन स्टोक्स 2-0-24-0, श्रेयस गोपाल 4-0-31-1, राहुल तेवातिया 3-0-23-0.
राजस्थान रॉयल्स : बेन स्टोक्स झे. बदली खेळाडू (ललित यादव), गो. देशपांडे 41 (35 चेंडूत 6 चौकार), जोस बटलर त्रि. गो. नोर्त्जे 22 (9 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. व गो. अश्विन 1 (4 चेंडू), संजू सॅमसन त्रि. गो. पटेल 25 (18 चेंडूत 2 षटकार), रॉबिन उत्थप्पा त्रि. गो. नोर्त्जे 32 (27 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार) रियान पराग धावचीत (पटेल) 1 (2 चेंडू), राहुल तेवातिया नाबाद 14 (18 चेंडूत 1 चौकार), जोफ्रा आर्चर झे. रहाणे, गो. रबाडा 1 (4 चेंडू), गोपाल झे. बदली खेळाडू (ललित यादव), गो. देशपांडे 6 (4 चेंडू). अवांतर 5. एकूण 20 षटकात 8 बाद 148.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-37 (बटलर, 2.6), 2-40 (स्टीव्ह स्मिथ, 3.6), 3-86 (बेन स्टोक्स, 10.2), 4-97 (सॅमसन, 11.4), 5-110 (रियान पराग, 13.2), 6-135 (उत्थप्पा, 17.3), 7-138 (आर्चर, 18.4), 8-148 (श्रेयस गोपाल, 19.6).
गोलंदाजी : रबाडा 4-0-28-1, तुषार देशपांडे 4-0-37-2, नोर्त्जे 4-0-33-2, रविचंद्रन अश्विन 4-0-17-1, अक्षर पटेल 4-0-32-1.