अहमदाबाद / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी व रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स हे जवळपास समसमान ताकदीचे संघ आज (मंगळवार दि. 27) आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडत आहेत. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होत आहे.
एकीकडे, आरसीबीला मागील सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून पत्करावा लागलेला 69 धावांचा नामुष्कीजनक पराभव मागे सारुन ताज्या दमाने मैदानात उतरावे लागेल तर दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादला सुपरओव्हरमध्ये नमवले असल्याने दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल अर्थातच उंचावलेले असणार आहे. आरसीबीला विजयाच्या ट्रकवर परतण्याकरिता मध्यफळीतील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱया या लढतीत बहरातील देवदत्त पडिक्कल व कर्णधार विराट कोहली यांचा फॉर्म देखील आरसीबीसाठी महत्त्वाचा ठरेल. आतापर्यंत देवदत्त पडिक्कलने 171 तर विराट कोहलीने 151 धावांचे योगदान दिले आहे.
आरसीबीच्या मध्यफळीत ग्लेन मॅक्सवेल (198 धावा), एबी डीव्हिलियर्स (129) व खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी झगडत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरचा (25) समावेश असून या तिघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेणे संघासाठी महत्त्वाचे असणार आहे. मॅक्सवेलने आरसीबीने मोजलेल्या प्राईस टॅगला न्याय देण्यासाठी पहिल्या टप्प्यात पुरेपूर प्रयत्न केला असून हाच फॉर्म कायम राहण्याची संघव्यवस्थापनाला त्याच्याकडून अपेक्षा असेल.
यापूर्वी, चेन्नईच्या फलंदाजांनी जो खरपूस समाचार घेतला, ते मात्र आरसीबीच्या गोलंदाजांना अर्थातच विसरावे लागणार आहे. विशेषतः पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलची जी धुलाई झाली, ती लक्षवेधी होती. जडेजाने त्याच्या डावातील शेवटच्या षटकात 37 धावांची आतषबाजी करत चाहत्यांची मने जिंकली होती. जलद गोलंदाज मोहम्मद सिराज व काईल जेमिसन यांनाही तिखट मारा करावा लागेल. शिवाय, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर यांना प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आरसीबीचा संघ येथे नवदीप सैनी किंवा डॅन ख्रिस्तियनऐवजी डावखुऱया शाहबाज नदीमला खेळवण्याचा पर्याय निवडणार का, हे येथे स्पष्ट होईल.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, शॅम्स मुलाणी, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, अनिरुद्ध जोशी.
आरसीबी ः विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन ऍलन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
बॉक्स
दिल्लीसाठी शिखर धवन, पृथ्वी शॉचा फॉर्म महत्त्वपूर्ण
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी सलामीवीर व स्पर्धेतील सर्वाधिक धावा जमवणाऱया शिखर धवन व पृथ्वी शॉ यांचा फॉर्म येथे महत्त्वाचा ठरेल. धवनने आतापर्यंत सर्वाधिक 259 धावा झोडपल्या आहेत तर पृथ्वी शॉने देखील 166 धावांचे योगदान दिले आहे.
दिल्लीच्या मध्यफळीत रिषभ पंत (125 धावा), ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेतमेयर यांचा समावेश असून विस्फोटक फलंदाजीची त्यांची क्षमता निर्विवाद आहे. सलामीवीर अपयशी झाल्यास पंत व स्मिथ यांच्यावरच मुख्य जबाबदारी असेल. दिल्लीला अश्विनची उणीव प्रकर्षाने जाणवू शकते. त्याच्या गैरहजेरीत डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल व लेगस्पिनर अमित मिश्रा यांच्याकडून दिल्लीला अधिक अपेक्षा असतील.
अवेश खानने 5 सामन्यात 11 बळी घेतले असून कॅगिसो रबाडा देखील प्रारंभीच काही धक्के देऊ शकतो. अश्विनच्या जागी ललित यादवला संधी मिळू शकते. ललित यादव ऑफस्पिन गोलंदाजी व उपयुक्त फलंदाजीही करु शकतो.