आयपीएल : समान बलाबल असलेल्या संघांकडून चुरशीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ दुबई
सूर गवसलेला आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या सरळ पण चैतन्यदायी नेतृत्वाविरुद्ध लागणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या सामन्यात प्रभावी प्रदर्शन केले असल्याने या लढतीत चुरशीची अपेक्षा केली जात आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल.
दिल्ली व आरसीबी दोन्ही संघांचे आतापर्यंतचे प्रदर्शन भक्कम झाले असून चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. रविवारी मुंबई संघ आघाडी मिळविण्याआधी दिल्ली व आरसीबी यांनी पहिली दोन स्थाने मिळविली होती. चार सामन्यात अय्यरने चांगला फॉर्म दाखविला असून पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर कोहलीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात सूर गवसला आहे. त्याने 53 चेंडूत नाबाद 72 धावा जमवित संघाला मोठा विजय मिळवून दिला. दिल्लीने केकेआरचा पराभव केला, त्यात अय्यरने 38 चेंडूत नाबाद 88 धावा झोडपल्या तर सलामीवीर पृथ्वी शॉने 66 धावांचे योगदान देत महत्त्वाची भूमिका बजावली. सोमवारच्या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार आघाडीवर राहून सेनापतीत्व करणार असून ते एकमेकापेक्षा सरस ठरण्याचा निश्चितच प्रयत्न करतील.
आघाडीवीर शॉने समाधानकारक प्रदर्शन केले असले तरी त्याचा जोडीदार शिखर धवनचा खराब फॉर्म ही अय्यरची चिंता ठरली आहे. मात्र रिषभ पंतला फॉर्म गवसल्याने त्याला दिलासाही मिळाला आहे. केकेआरविरुद्ध पंतने 17 चेंडूत 38 धावा फटकावल्या होत्या. याशिवाय स्टोईनिस व हेतमेयर देखील सज्ज झाले आहेत. गोलंदाजीमध्ये रबाडाने केकेआरविरुद्ध धावा दिल्या असल्या तरी तो दिल्लीचा भरवशाचा गोलंदाज आहे. द.आफ्रिकेचा ऍन्रिच नॉर्त्जेने केकेआरविरुद्ध सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये अप्रतिम मारा केला तर इशांतच्या जागी घेतलेल्या हर्षल पटेलनेही समाधानकारक कामगिरी करताना 34 धावांत 2 बळी मिळविले. आर.अश्विन व स्टोईनिस मात्र थोडेसे महागडे ठरले होते.
आघाडीवीर देवदत्त पडिक्कल हा आरसीबीचा भरवशाचा फलंदाज बनला असून या मोसमात सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांत तो चौथ्या (174) क्रमांकावर आहे. त्याने तीन अर्धशतके फटकावली आहेत. त्याच्यासोबत फिंचला लय सापडली तर या जोडीला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना अवघड जाऊ शकते. याशिवाय कोहली, डी व्हिलियर्स, दुबे गुरकीरत सिंग हेदेखील फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीत नवदीप सैनीला उदानाची चांगली साथ मिळत असून वॉशिंग्टन सुंदर व यजुवेंद्र चहल या स्पिनर्सचीही त्यांना पूरक साथ मिळत आहे. ऍडम झाम्पाला मात्र अजून वातावरणाशी जुळवून घेता आलेले नाही.
संघ : दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल्। डेनिस सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डी व्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, फिलिप, मॉरिस, मोईन अली, सिराज, नदीम, शाहबाज नदीम, पडिक्कल, चहल, सैनी, स्टीन, नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत मान, सुंदर, पवन देशपांडे, झाम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.