15 नेत्यांचा समावेश, प्रबळ उमेदवार देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी पंधरा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीत दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांचाही समावेश आहे. 8 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होत असून 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
या समितीत मनोज तिवारींसह दिल्लीतील भाजपचे सर्व खासदार अनिल जैन, दुष्यंत गौतम आणि आर. पी. सिंग हे राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, दिल्ली प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष विजय गोयल आणि सतीश उपाध्याय, संघटना सचिव सिद्धार्थन आणि दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनम झा तसेच विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते विजयेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.
पुढील आठवडय़ापासून प्रचारकार्याला सुरुवात करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्याबरोबरच जाहीर सभा आणि पदयात्रांचाही प्रचार योजनेत समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार सभा घेण्याची शक्मयता आहे. पक्षाध्यक्ष अमित शहाही आठ ते दहा सभा घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. इतर पक्षही तयारीला लागले आहेत.