ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील सहा दिवसात एक लाखापेक्षा अधिक लोकांची कोरोना तपासणी केली गेली. या दिवसात प्रत्येक दिवशी सरासरी 19 हजार चाचण्या केल्या गेल्या. त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे चाचण्यांची संख्या वाढवली असली तरी, कोरोना संसर्गाच्या संख्येत वाढ झाली नाही आहे. गेल्या 6 दिवसात कोरोना संसर्गाचा दर 10 टक्क्यांनी कमी झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 4 लाख 98 हजार 416 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील 1 लाख 13 हजार 450 टेस्ट या मागील 6 दिवसात करण्यात आल्या आहेत. 23 ते 28 जून या काळात प्रत्येक दिवशी सरासरी 19 हजार टेस्ट केल्या गेल्या. टेस्ट वाढवण्याच्या मनाने संसर्गाचा दर कमी आहे.
23 जून रोजी सर्वाधिक म्हणजेच 3934 नवे रुग्ण आढळले होतेे आणि याच दिवशी 16, 952 नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यानुसार, 23 जूनला 23.80 टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. 6 दिवसांनी 28 जूनला 14.80 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. तर 28 जूनला जवळपास 20 हजार 80 जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यातील 2889 लोक पॉझिटिव्ह आढळले होते.