नवी दिल्ली : 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया 2022 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्लीच्या रणजी संघामध्ये यश धुलचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली संघातील वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघ निवडीवेळी काही समस्यामुळे उपलब्ध होवू शकला नाही. अलिकडे आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय युवा संघाचा यश धुल कर्णधार आहे.
दिल्ली रणजी संघाचे नेतृत्व प्रदीप सांगवानकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात भारतीय युवा संघाने 19 वर्षांखालील वयोगटातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा विंडीजमध्ये जिंकली होती. भारतीय युवा संघाने आतापर्यंत पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यश धुलचे गुरूवारी गुवाहाटीमध्ये आगमन झाले असून त्याला पाच दिवसांसाठी क्वॉरंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. क्वॉरंटाईनचा कालावधी संपल्यानंतर तो दिल्ली रणजी संघात दाखल होईल.
दिल्ली रणजी संघ – प्रदीप संगवान (कर्णधार), नितिश राणा, ध्रुव शौरे, पी.आर्य, यश धुल, के.शर्मा, जे. सिद्दू, हिम्मत सिंग, ललित यादव, अनुज रावत, लक्ष थरेजा, नवदीप सैनी, सिमरनजीत सिंग, मयांक यादव, कुलदीप यादव, विकास मिश्रा, शिवांग वशिष्ट, शिवम शर्मा.