- ‘या’ तारखेपासून होणार ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सद्य स्थितीत कोरोनाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेत दिल्ली विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, स्नातक आणि स्नातकोत्तरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या आणि लास्ट सेमिस्टरच्या परीक्षा 15 मे रोजी सुरू होणार होत्या. मात्र, आता या परीक्षा 1 जून 2021 पर्यंत स्थगित केल्या आहेत.
दिल्ली विद्यापीठाचे डीन ऑफ एग्जामिनेशन डी. एस. रावत यांनी सांगितले की, 2 मे रोजी सर्व विभागाचे प्रमुख आणि डीन यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षा 1 जून पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तर परीक्षेची नवीन तारीख एक जूनपूर्वी डीयूच्या अधिकृत संकेतस्थळ exam.du.ac.in जारी केली जाईल.
रावत यांनी पुढे सांगितले की, 1 जूननंतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी देखील कोरोनामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आल्या होत्या. तर अन्य सेमिस्टरच्या परीक्षांचा निर्णय देखील विद्यापीठाद्वारे लवकरच घेतला जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.