ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा आता पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. सभागृहात ठेवण्यात येणारी सर्व कागदपत्रे आता केवळ ई-पेपरच्या स्वरूपातच मांडण्यात येणार आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”दिल्ली विधानसभा आता पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. प्रत्येक अधिवेशनात लाखो पानांची कागदपत्रे सभागृहात ठेवली जातात, ती आता केवळ सॉफ्ट कॉपी म्हणून ठेवली जाणार आहेत. दिल्ली विधानसभेचे सर्व कामकाज डिजिटल पद्धतीने व्हावे, यासाठी सर्व आमदारांना ई-पॅड देण्यात आले आहेत. दिल्ली विधानसभा पेपरलेस करण्यासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.”
नागालँड देशातील पहिली पेपरलेस विधानसभा
नागालँड विधानसभा ही देशातील पहिली पेपरलेस विधानसभा आहे. शनिवारी ही विधानसभा पूर्णत: पेपरलेस करण्यात आली. राष्ट्रीय ई-विधान अर्ज (नेवा) कार्यक्रम येथे लागू झाला आहे. ही विधानसभा पेपरलेस झाल्यानंतर नागालँड विधानसभा सचिवालयातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मध्यात ६० सदस्यांच्या विधानसभेतील प्रत्येक टेबलाला एक टॅब्लेट जोडण्यात आला आहे.