नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीमध्ये रूग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारने बँकॉकवरुन ऑक्सिजनचे 18टँकर्स मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवाई दलाची विमाने देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे टँकर्स यायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारशी यासंदर्भात होणारी चर्चा सकारात्मक आहे. फ्रान्समधून 21 रेडी टू युज ऑक्सिजन प्लांट्स मागवण्यात आले असून त्यांचा वापर लगेच करता येणार आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट्स बसवण्यात येणार आहेत. आम्ही देशातल्या काही मोठ्या उद्योगपतींनाही मदतीसाठीची पत्रे पाठवली होती. त्यांनीही मदत करण्याचं मान्य केलं आहे. पण त्यांनी आपलं नाव जाहीर होऊ नये अशी अट घातली आहे. दिल्लीतली परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या टीमने एकत्र मिळून खूप कष्ट केल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले.
केंद्र सरकारही ऑक्सिजन आयात करणार असून 5 टँकर्स खास दिल्लीसाठी मागवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात एकूण 44ऑक्सिजन प्लाँट बसवणार आहे. त्यापैकी 21 प्लांट्स फ्रान्सकडून येणार असून 8प्लांट्स केंद्र सरकार बसवणार आहे. तर उरलेले सर्व प्लांट्स दिल्ली सरकार बसवणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दिल्लीला मदत केल्याबद्दल अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती, सेवाभावी संस्था आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.