वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या एअरटेल पुरस्कृत दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले. कोरोना महामारीची स्थिती चालू असताना जैवसुरक्षित वातावरणात झालेल्या या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरूष विभागात इथिओपियाचा वॅलेलेगन आणि महिला विभागात येहुआलॉ यांनी अजिंक्यपद पटकाविले.
इथिओपियाचे विजेते येहुआलॉ आणि वॅलेलेगन यांनी या शर्यती जिंकताना नवे विक्रम नोंदविले. इथिओपियाचे हे दोन्ही धावपटू इलाईट गटातील विजेते म्हणून नोंदले गेले. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या वॅलेलेगनने पुरूष विभागातील जेतेपद मिळताना 58.53 सेकंदाचा अवधी घेतला तर महिला विभागात येहुआलॉने एक 1 तास, 0.4.46 सेकंदाचा अवधी घेत नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. या कामगिरीमुळे येहुआलॉला 27 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस तसेच स्पर्धा विक्रम केल्याबद्दल जादा 10,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम बोनस म्हणून देण्यात आली. पुरूष विभागातील विजेत्या वॅलेलेगनला 27 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये येहुआलॉने दुसऱया क्रमाकांची सर्वोत्तम जलद वेळ नोंदविली. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या विभागात इथिओपियाच्या अबाबेल येसानेहने तिसरे स्थान मिळविले.
दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या भारतीय स्पर्धकांच्या गटात पुरूष विभागात महाराष्ट्राचा 26 वर्षीय धावपटू अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. सर्वंकष पुरूष विभागात तो 10 व्या स्थानावर राहिला. महाराष्ट्राच्या साबळेला जेतेपदाबरोबरच 3.5 लाख रूपयांचे पहिले बक्षीस तसेच भारतीय स्पर्धकांमध्ये नवा विक्रम केल्याबद्दल त्याला जादा एक लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले. यापूर्वी राष्ट्रीय हाफ मॅरेथॉनमध्ये भारतीय स्पर्धकांतर्फे महाराष्ट्राच्या कालीदास हिरवेने 1 तास, 03.46 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. हा विक्रम अविनाश साबळेने या स्पर्धेत मागे टाकला. 2018 साली या स्पर्धेत विजेतेपद तर 2019 साली रौप्यपदक मिळविणारा इथिओपियाचा बेलीहु याला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 21.09 कि.मी.चे अंतर 58.54 सेकंदात जिंकली. युगांडाचा किसाने 58.56 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात केनियाच्या रूथ चिपेंगटिचने दुसरे तर इथिओपियाच्या येसानेहने तिसरे स्थान मिळविले. भारतीय स्पर्धकांच्या विभागात महिलामध्ये पारूल चौधरीने सुवर्ण, संजीवनी जाधवने रौप्य आणि कोमल जगदाळेने कास्यपदक घेतले. रविवारी दिल्ली हाफ मॅरेथॉनला येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमपासून प्रारंभ झाला. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु तसेच भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी उपस्थिती दर्शविली. ही हाफ मॅरेथॉन तीन गटामध्ये घेण्यात आली. सुमारे 14 हजार स्पर्धकांनी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग दर्शविला.