गौरव समितीची सरकारकडे मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीय नामवंत चित्रपट संपादक स्व. वामन भोसले यांचा गोवा सरकारने यथोचित सन्मान करावा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे स्थान द्यावे, अशी मागणी त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गौरव समितीने केली आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे सदस्य शैलेंद्र मेहता, ज्ञानेश मोघे, दिनेश भोसले, विकास भोसले यांनी वरील मागणी करून सांगितले की, भोसले यांचे नाव पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करणे, गोवा विद्यापीठात त्यांच्या नावाने पीठ स्थापन करून चित्रपटावरील आधारीत अभ्यासक्रम सुरू करावा, तसेच चित्रपट संपादित वर्गवारीत त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा, अशा तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची भेट घेऊन त्यांना समितीतर्फे वरील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील नामवंत कलाकार व इतर मंडळीनी भोसलेंचे नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवले आहे, अशी माहिती देण्यात आली. त्या मंडळीत बोनी कपूर, मिथून चक्रवर्ती, सुभाष घई, मुकेश भट, एन. चंद्रा, जयंत धर्माधिकारी, रवी टंडन व इतरांचा समावेश आहे. गोव्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस, आमदार ग्लेन टिकलो यांनी देखील तशीच शिफारस केली आहे.