देशात 3 लाख 14 हजार बाधितांची नोंद : यापूर्वी अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 7 हजारांची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील वाढणाऱया रुग्णसंख्येने जगभरातील आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच भारतात एका दिवसात जवळपास सव्वातीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसात सर्वाधिक 3 लाख 7 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात 3 लाख 14 हजार 835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2,104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 1 लाख 78 हजार 841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 2 लाख 95 हजार 041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, देशात 13 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
देशात आतापर्यंत 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या संसर्गातून 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 जण सावरले असून त्यांना उपचाराअंती डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील एकंदर मृत्यूसंख्या आता 1 लाख 84 हजार 657 इतकी झाली आहे. मात्र, रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा 22 लाख 91 हजार 428 वर पोहोचला आहे.
लसीकरणात वाढ
आतापर्यंत देशात 13 कोटी 15 लाख 43 हजार 927 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देऊन झाला आहे. देशातील 11 कोटी 28 लाख 13 हजार 864 जणांनी लसचा पहिला डोस घेतला आहे तर 1 कोटी 87 लाख 30 हजार 63 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.