मंगळवारी 1870 जण कोरोनामुक्त : एकूण बाधितांचा लाखाचा टप्पा पार चार दिवसात गेले 204 जणांचे बळी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सुसाट वेगाने वाढणाऱया कोरोनाबाधितांच्या संख्येने काल मंगळवार दि. 4 मे रोजी एक लाखाचा टप्पा पार केला असून ही संख्या गेल्या वर्षभरातील आहे. सक्रिय रुग्णसंख्या 26 हजार पार करून पुढे गेली असून कालच्या 52 मृतांसह वर्षभरातील एकूण बळींची संख्या 1372 वर पोहोचली आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून बळींची संख्या जी अर्धशतक पार करून पुढे गेली होती ती चौथ्या दिवशी म्हणजे दि. 4 मे पर्यंत कायम राहिली आहे. दि. 1 मे रोजी 54 बळी, दुसऱया दिवशी 52 बळी, तिसऱया दिवशी 46 आणि काल दि. 4 रोजी पुन्हा 52 बळी गेले असून केवळ चारच दिवसात 204 जणांनी प्राण गमावले आहेत.
मंगळवारी राज्यात 2814 नवीन बाधित सापडले तर 1870 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण 100902 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 72799 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे घटणारे प्रमाण आणखीही घटत मंगळवारी 72.15 टक्क्यांवर पोहोचले आहे. गत 24 तासात 277 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 2426 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
मंगळवारी दगावलेल्या 52 रुग्णांपैकी 28 गोमेकॉत तर 14 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय 2 उत्तर जिल्हा इस्पितळ, चिखली, कुडचडे, लोटली ईएसआय आणि बाळ्ळी आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक मृत्यू आणि दक्षिण गोव्यातील खाजगी इस्पितळात दगावलेल्या 2 रुग्णांचा समावेश आहे.
मडगाव केंद्रात 2262 रुग्ण राज्यातील मडगाव, पणजी, पर्वरग्नी, कांदोळी, म्हापसा, डिचोली, फोंडा, कासावली, कुठ्ठाळी या केंद्रात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. मडगाव केंद्रात सर्वाधिक 2262 रुग्ण आहेत. त्या खालोखाल पणजीत 1695 रुग्ण आहेत. अन्य तीन केंद्रात प्रत्येकी 1500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्याशिवाय पर्वरीत 1293, कासावली व डिचोलीत प्रत्येकी एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.