गुजरातमधील स्तंभेश्वर महादेव मंदिर
श्रावण महिन्यात महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. देशभरातील महादेव मंदिरांमध्ये श्रावण मासानिमित्त विविध प्रकारचे उत्सव आयोजित होत असतात. गुजरातच्या वडोदरापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर कावी-कंबोई गावात एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर कार्तिकेय स्वामी यांनी स्थापन केल्याचे मानले जाते. हे मंदिर दिवसातून दोनवेळा समुद्रात बुडते. या मंदिराची महती आता विदेशातही पसरली आहे.
समुद्रात येणाऱया भरतीमुळे हे मंदिर पाण्यात बुडते आणि काही वेळानंतर पुन्हा दिसू लागते. गुजरातच्या जंबूसर तालुक्यतील हे मंदिर शिवभक्तांसह अन्य पर्यटकांनाही चकित करणार आहे. मंदिराचा चमत्कार पाहण्यासाठी देशविदेशातून हजारो पर्यटक येथे येत असतात.
समुद्राची पातळी कमी असेल तेव्हाच मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन करता येते. भरतीवेळी शिवलिंग पूर्णपणे पाण्यात बुडते, त्यावेळी मंदिरापर्यंत पोहोचता येत नाही. हे मंदिर अरबी समुद्रातील कॅम्बे किनाऱयावर तयार करण्यात आले आहे.
शिवपुराणात मंदिराचा उल्लेख
या तीर्थक्षेत्राचा उल्लेख श्री महाशिवपुराणच्या रुद्रसंहितेत आढळून येतो. या मंदिरात सुमारे 4 फूट उंचीचे आणि 2 फूट रुंदीचे शिवलिंग आहे. मंदिराच्या आसपास अरबी समुद्राचे दृश्य अत्यंत मनमोहक दिसून येते. येथे येणाऱया भाविकांना भरती-ओहोटीच्या वेळेची विशेष काळजी घ्यावी लागते.