शुक्रवारी 196 नवे रुग्ण : 129 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील कोरोनाचे आव्हान वाढतच चालले आहे. काल शुक्रवारी नव्याने 196 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1337 वर पोचली आहे. तसेच अजून 3285 चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. काल शुक्रवारी 129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वास्कोची स्थिती स्फोटक बनत चालली असून मांगोरहिलशी संबंधित प्रकरणांचा आकडा वाढत चालला आहे.
रस्ता वाहतूक, रेल्वे व हवाई वाहतुकीद्वारे आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 131 एवढी आहे. मांगोरहिलची रुग्णसंख्या कमी होऊन 43 वर आली आहे. मात्र मांगोरहिलशी संबंधित आकडा 417 वर पोचला आहे. वास्को भागाची स्थिती स्फोटक बनली आहे. सडा भागातील रुग्णसंख्या 100, बायणा-138, न्युवाडे वास्को-112, झुवारीनगर-192, खारवीवाडा येथील रुग्णसंख्या 104 वर पोचली आहे.
चिंबलची रुग्णसंख्या 124, टय़ुलीप डायग्नॉस्टिक-139, कुडतरी-39, बाळ्ळी-42, खांडोळा-36, लोटली-25, पणजी-10, मडगाव-25, नेरुल-23, नावेली-10, पर्वरी-18, फोंडा-45, करासवाडा-37, पेडणे-18, केपे-25, शिरोडा-20, सांखळी-12, वाळपई-21 अशी अन्य भागातील रुग्णसंख्या आहे.
रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. ग्रमीण भागापर्यंत कोरोनाचे लोण पसरले आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित 21 रुग्णांना मरण आले आहे.
गोव्यात 17 जुलैपर्यंत कोरोनाबाधित 3304
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 1946
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण 1337
17 जुलै रोजीचे नवे रुग्ण 196
17 जुलै रोजी बरे झालेले रुग्ण 129
आतापर्यंतचे मृत्यू 21
माजी महसूलमंत्र्यासह : कुटुंबीयही पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / वास्को
राज्याचे एक माजी महसूलमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यासह पत्नी व तिन्ही मुलांना कोरोनाची बाधा झालेली असून या कुटुंबाला मडगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या माजी महसूलमंत्र्यांच्या ज्येष्ठ बंधूचा हल्लीच कोविडमुळेच मृत्यू झाला होता. हे माजी महसूलमंत्री व त्यांच्या मुलाला ताप आला होता. त्यामुळे त्यांनी डेग्यू, मलेरियाच्या चाचण्या केल्या. त्या निगेटिव्ह आल्याने अखेर कोविड चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. संशयानेच त्यांची पत्नी व दोन मुलींची कोविड चाचणी करण्यात आली असता तीसुध्दा पॉझिटिव्ह आढळून आली. कुटुंबातील पाचही जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले तरी त्यांची प्रकृती उत्तम आहे. या कुटुंबाला सध्या कोणताही त्रास नाही. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी त्यांना मडगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.