उद्योजक, समाजसेवक राजेश फळदेसाई यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /तिसवाडी
दिवाडीतील आणि कुंभारजुवे मतदारसंघातील युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी आपण सर्व ती मदत करणार आहे. कुणीच क्रीडापटू मागे राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे प्रतिपादन कुंभारजुवे मतदारसंघातील उद्योजक, समाजकासेवक तथा काँग्रेसचे नेते राजेश फळदेसाई यांनी केले.
दिवाडी बेटावरील एफसी दिवार क्लबने आयोजित केलेल्या आणि राजेश फळदेसाई यांनी संपूर्णपणे पुरस्कृत केलेल्या अखिल गोवा सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना फळदेसाई यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की कुंभारजुवे मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये विकासकामे राबविण्यात येत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन विकास घडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समाजाच्या अनेक क्षेत्रांतून लोकांना मदत करताना क्रीडा क्षेत्रातही मदत करण्यात येत आहे. आज संपन्न झालेली फुटबॉल स्पर्धा खूप रंगतदार झाली. ती पाहून आपण आश्चर्यचकित झालो. फुटबॉलपटूनी असेच कलाकौशल्य दाखवावे, भारतीय फुटबॉल संघातून खेळावे आणि दिवाडी गावचे, कुंभारजुवे मतदारसंघाचे तसेच गोव्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी आवश्यक असलेली मदत आपण करणार, असेही फळेदसाई म्हणाले.
डॅडीज बॉयज ऑफ सावर्डे आणि उंची बॉयज ऑफ रायबंदर यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात डॅडीज बॉयजने उंची बॉयजचा पराभव केला. विजेत्या डॅडीज बॉयजला रोख रु. 50 हजार व चषक तसेच उपविजेत्या उंची बॉयजला रोख रु. 30 हजार व चषक समाजसेवक राजेश फळदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पहिल्या उपांत्या सामान्यातील पराभूत संघाला रु. 5 हजार तसेच दुसऱया उपांत्य सामन्यातील पराभूत संघाला रु. 5 हजार व चषक देण्यात आले.
बिबियान फर्नाडिस यावेळी म्हणाले की कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात दिवाडी गाव सुन्न पडला होता. लोकांचे जगणे अवघड बनले होते. अशावेळी राजेशभाई फळदेसाई यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. क्रिकेट, फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन मुलांमध्ये, तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला. गावकऱयांची अनेक कामे त्यांनी करुन दिली. देव त्यांचे भले करो, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर अंडर 16 भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बिबियान फर्नांडिस, अंडर 17 भारतीय फुटबॉल संघाचे गोलकीपर तसेच 2017 फुटबॉल वर्ल्ड कप भारतीय संघाचे प्रशिक्षक मारियो आगियार, अंडर 15 भारतीय फुटबॉल संघाचे सहायक प्रशिक्षक कानन प्रियोळकर, गोलती-नावेलीचे सरपंच मारियो पिंटो, एडी पिकार्डो, ज्यून पिकार्डो, प्रसाद पेडणेकर, रमेश कुंकळकर, एल्वीस आगियार सर्व पंच सदस्य गोलती-नावेली, तसेच इवान डायस, रेमस गोम्स, अमोल आमोणकर उपस्थित होते.