प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील दिवाणखवटी येथील 24 वर्षीय तरूणाचा बीड येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. रोशन राजेंद्र मोरे असे मृत तरूणाचे नाव आहे.
तो नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता. मित्रांसमवेत बीड येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी दुचाकीने गेला होता. दुचाकीने परत येत असताना अंधाराचा अंदाज न आल्याने तो मागून बैलगाडीवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त येथे धडकताच त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. रोशनच्या अपघाती निधनाने दिवाणखवटीवर शोककळा पसरली आहे.