बाजारपेठेसह अनेक ठिकाणी समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात मोकाट जनावरांचा वावर पुन्हा एकदा वाढला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिय्या मांडून वाहतुकीला अचडण निर्माण होत आहे. मनपाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी व्यक्त करण्यात येत आहे.
रात्रीच्यावेळी मोकाट कुत्रीही नागरिकांना त्रास करू लागली आहेत. खास करून पहाटे फिरावयास जाणाऱया व रात्रीच्यावेळी फिरावयास जाणाऱया नागरिकांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याशेजारी टाकण्यात येणाऱया कचऱयापाशी ही कुत्री अधिक संख्येने वावरत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील सर्रास ठिकाणी असलेल्या कचराकुंडी हटविण्यात आल्या आहेत. अधिकतर नागरिकांच्या घरी जाऊन कचरा संकलित केला जात आहे, तरीही काही नागरिक रस्त्याशेजारी कचरा फेकत असतात. यामुळे ज्या ठिकाणी कचरा तुंबून असतो त्या ठिकाणी ही कुत्री घर करून असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातही मोकाट जनावरांचा वावर वाढला असून काही गायी व वासरे भर रस्त्यातच ठाण मांडून बसतात. नागरिकांनी उसकण्याचा प्रयत्न केला तरी ही जनावरे जागेवरुन हटत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने थांबवून बाजूने जावे लागते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करण्याबरोबरच काहीवेळा या जनावरांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. महानगरपालिकेने मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.