दिवाळीच्या खरेदीला उधाण : कोरोना निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठेत गर्दी : फेरीवाले-भाजी विक्रेत्यांची मनमानी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील वषी नागरिकांना दिवाळीसह सर्व सण घरीच बसून साजरे करावे लागले. दिवाळीनिमित्त खरेदीला बाहेर पडता आले नाही. मात्र, यंदा कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळी सणाच्या खरेदीकरिता शहरात आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
बाजारपेठेतील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचा मनमानी कारभार वाढला असून रस्त्याच्या मध्यावर ठाण मांडल्याने रहदारीस अडचण होत आहे. दिवाळी सणाच्या खरेदीकरिता शहरात येणाऱया नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत असून प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. याची जाणीव रहदारी खात्याला असूनही येथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब रविवारी निदर्शनास आली. परिणामी शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. बाजारपेठेत फेरीवाल्यांनी आणि भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले असल्याने याची डोकेदुखी झाली आहे. गणपत गल्लीमध्ये वाहतूक कोंडीमुळे दुचाकी वाहनधारकांना आणि पादचाऱयांना कोंडीमध्ये अडकून पडावे लागले.
कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. अशातच दिवाळी सणाच्या तोंडावर शाळा सुरू होत असल्याने मुलांना लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या खरेदीला उधाण आल्याने चार चाकी वाहने पार्क करण्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडी
शहराला जोडणाऱया प्रमुख मार्गांवर मोठय़ा प्रमाणात वाहनांचा रांगा लागल्या होत्या. सर्वच मार्गांवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागले. वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेले रहदारी पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.
पार्किंगला शिस्त लावण्याची मोहीम
शहरातील रस्त्यांवर हव्या त्या ठिकाणी वाहने पार्क करणे तसेच तासन्तास वाहन पार्क करून ठेवून वाहतूक कोंडी निर्माण करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रहदारी पोलीस प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागात पार्किंगला शिस्त लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. खडेबाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली अशा विविध परिसरात रहदारी पोलीस नियुक्त करून वाहनधारकांना शिस्त लावण्यात येत आहे. ऑड-इव्हन पद्धतीने वाहन पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यांवर वाहने पार्क करणाऱया वाहनधारकांना सूचना देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.