प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळी अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपल्यामुळे आतापासूनच खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत. रविवारी नोकरदारवर्गाला सुटी असल्यामुळे सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. कपडे, आकाश कंदिल, सुगंधी उटणे, अत्तर, साबण, तेल, पणत्या, लायटींगच्या माळा यांच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
बेळगावसह सर्वत्रच दिवाळीचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. परंतु मागील वषी कोरोनामुळे हा आनंद नागरिकांना साजरा करता आला नाही. यावषी मात्र कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर खरेदीची धूम दिसत आहे. 1 नोव्हेंबर रोजी वसुबारस असून, तेव्हापासून दिवाळीला सुरुवात होते. अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्यामुळे आतापासूनच नागरिकांनी खरेदी सुरू केली.
पुढील रविवारी गर्दीमध्ये खरेदी करण्यापेक्षा याच रविवारी खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. यामुळे किर्लोस्कर रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ, कलमठ रोड, काकतीवेस रोड, शनिमंदिर रोड, बापट गल्ली, हंस टॉकीज रोड, बुरुड गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, कांदा मार्केट या शहराच्या मुख्य भागात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे. यासोबत मातीच्या पणत्या, सुगंधी उटणे, साबण, अत्तर यामुळे सर्वत्र सुगंध दरवळत होता.
फराळासाठी लागणाऱया साहित्याची खरेदी
दिवाळी म्हटली की दिवाळीचा फराळ हा आलाच. तो तयार करण्यासाठी आधीपासूनच महिलांची जय्यत तयारी सुरू असते. अनेक नोकरदार महिला असल्याने त्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी फराळाच्या साहित्याची खरेदी केली. मैदा, रवा, गुळ, डाळ, पोहे, शेंगदाणे, फुटाणे, खोबरे, तेल यासह इतर साहित्याच्या खरेदीसाठी किराणा मालांच्या दुकानांवर गर्दी झाली होती. रविवारपेठेतील होलसेल मार्केटमध्येही बेळगावसह आजुबाजूच्या किरकोळ व्यापाऱयांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.