गांधी मैदानावर पणत्या, आकाश, कंदील, सजावटीचे साहित्य खरेदीलागर्दीवाढुलागली
प्रतिनिधी/ सातारा
दिवाळी सण अवघ्या दहा दिवसावर आला असून बाजारपेठा साहित्यांनी सजु लागल्या आहेत. शहरातील गांधी मैदान येथे विक्रेत्यांनी पणत्या, रांगोळी, आकाश कंदील, किल्ल्यावरचे मावळे, सैनिक असे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. तसेच दुकानातही साहित्य उपलब्ध झाल्याने ग्राहक खरेदीला घराबाहेर पडत आहेत.
कोरोनाने यंदा सर्व सणाचा उत्साह कमी केला आहे. तरीही सण साजरी करण्याकडे भर दिला जात आहे. गणेशोत्सव, नवरात्र, पाठोपाठ आता दिवाळीचे वेध लागले आहेत. येत्या 14 नोव्हेंबरला दिवाळी सणाला सूरूवात होत आहे. या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व असते. यामुळे बाजारात मातीचे, चिनी मातीचे, प्लास्टिकचे असे दिवे विक्रीसाठी आलेले आहेत. शहरातील मोती चौक, गांधी मैदान येथे विक्रेते यांची विक्री करत आहेत. महिला, तरूणी यांची गर्दी वाढत आहे. आकाश कंदील हे या सणाचे प्रमुख आकर्षण असल्याने दरवर्षी पेक्षा वेगळया आकाराचा, रंगाचा आकाश कंदील खरेदीवर केला जातो. यंदा कोरोनामुळे गतवर्षीचा आकाश कंदील लावण्याचा कल दिसत आहेत. तरीही विक्रेत्यांनी नवीन आकाश कंदील विक्रीसाठी आणले आहेत. रंगबेरंगी रांगोळी, छाप, स्टिकर उपलब्ध झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे बालचिमुकल्यांनी किल्ला बनवायला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे मित्र परिवार सोबत न घेता यंदा कुटुंबातील सदस्यासोबत मिळून किल्ला बनवला जात आहे. या किल्ल्यावरचे मावळे, सैनिक, शिवाजी महाराज यांचा मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही दुकानात सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फराळही कमी प्रमाणात बनवण्यात येत आहे. भाजीपाल्यासह, डाळीचे दर चांगलेच कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्याच्या खिशावर दरवाढीचा भार वाढला आहे. फटाके न वाजता शांततेत दिवाळी सण साजरी करण्याचे आवाहन सर्वत्र होत आहे.