वार्ताहर / शाहूपुरी
दिवाळी सण मोठा…. नाही आनंदाला तोटा….या उक्तीप्रमाणे दिवाळीत प्रत्येकजण काही ना काही तरी खरेदी करत असतो. आता हा दिवाळी सण अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीच्या सणासाठी कपडय़ांसह लागणाऱया वस्तूंची बाजारपेठत रेलचेल वाढली आहे. नागरिकांही दिवाळीपूर्वी सुट्टीच्या दिवसांपूर्वीच बाजारपेठेत आता खरेदीसाठी गर्दी करु लागले आहेत.
दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर घराघरात उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण असल्याने या सणासाठी कपडे, दागिने, वाहन व नवीन वस्तूंची हमखास खरेदी केली जाते. यावर्षी दि. 1 नोव्हेंबर रोजी वसुबारस, दि. 2 रोजी धनत्रयोदशी, दि. 4 रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, दि. 5 रोजी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि दि. 6 रोजी भाऊबीज असा हा दीपोत्सव साजरा होणार आहे. गोवत्सपुजा व धनत्रयोदशीने दिपोत्सवास प्रारंभ होत असल्याने सणाच्या तयारीसाठी आता अवघे पाच दिवस राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठही दिवाळीच्या चाहुलीने गजबजली आहे. दीपोत्सवाच्या स्वागतासाठी लागणाऱया साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. त्यामुळेच बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीबरोबरच कपडे व दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजल्या आहेत. शहर परिसरातील बाजारपेठेत वही पुजनासाठी हिशेबाजच्या चोपडी पुस्तक, विविध रंगातील आकारातील आकाशकंदील पणत्या, रांगोळीचे रंग, मिठाई, किराणा साहित्यासह कपडे फटाके, भेट वस्त, प्रिटींग आदी वस्तूंची दुकाने दिवाळीच्या व्यवसायासाठी सज्ज झाली आहेत.
शहरात पोवईनाका, राजवाडा, राजपथ, मोतीचौक, खणआळी, पाचशेएकपाटी, भाजी मंडई परिसर, शाहूनगर, एस. टी. स्टॅण्ड बॉम्बे रेस्टारंट, समर्थ मंदिर, शाहूपुरी, करंजे, तामजाईनगर, कृष्णानगर, संगमनगर परिसरात दिवाळी साहित्यांची दुकाने मोठय़ा प्रमाणात थाटली आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे नागरिकांना दिवाळी सण मोठय़ा प्रमाणात साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचे सावट काही अंशी कमी झाल्याने दिवाळी सणासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.
शासकीय कर्मचाऱयांसाठी सलग सुट्टय़ा….
बहुतांश शासकीय कार्यालयांना दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी ते भाऊबीज अशी सुट्टी असते. यावर्षी दि. 4 रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, दि. 5 रोजी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि दि. 6 रोजी भाऊबीज असा दिवाळी सण साजरा होत असला तरी भाऊबीजेला जोडून रविवार आल्याने सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे.