फोंडय़ात कडाडत्या विजांसह पाऊस : वीज पुरवठा गुल्ल
प्रतिनिधी /फोंडा
दिवाळीच्या दिवशी फोंडा तालुक्यातील विविध भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. दुपारी 3.30 वा. सुमारास अचानकपणे आसमंतात काळे ढग दाटून आले. सुसाटय़ाचा वारा सुटला व विजांच्या कडकडाटासह तासभर मुसळधार पाऊस कोसळला. अचानकपणे कोसळलेल्या या पावसामुळे फोंडा शहर व तालुक्याच्या अन्य काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने घरोघरी चाललेल्या लक्ष्मी पुजनाच्या तयारीत व्यत्यय आला. लक्ष्मी पुजनात गुंतलेल्या व्यापाऱयांचीही गैरसोय झाली.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बुधवारी रात्री असाच पाऊस कोसळल्याने तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या नरकासूर वध स्पर्धा तसेच आकाशकंदील स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर परिणाम झाला. दिवाळीच्या स्वागतासाठी गुंतलेली लहान मुले व युवावर्गासह सर्वांनाच आपला उत्साह आवरता घ्यावा लागला. गेल्या काही वर्षांपासून नरकचतुर्थीच्या दिवशी हमखास पाऊस पडतो. त्यामुळे दिवाळीच्या स्वागतासाठी गावोगावी होणारे कार्यक्रम आयत्यावेळी रद्द करावे लागत आहेत. यंदाच्या दिवाळीचे स्वागतही पावसाच्या सरींनी झाले.
गुरुवारी दुपारी घरोघरी लक्ष्मी पुजनाची तयारी सुरु असतानाच, सुसाटय़ाच्या वाऱयासह पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. साकव-बोरी येथे फोंडा-मडगाव महामार्गावर माड कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय आला. यशवंतनगर तिस्क फोंडा येथेही रस्त्यावर झाड कोसळले. फोंडा अग्नीशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तालुक्यातील अन्य भागात या पावसामुळे फारशी पडझड झाल्याचे वृत्त नाही.