कोरोनामुळे घराची रंगरंगोटी थंडच
प्रतिनिधी /बेळगाव
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी दिवाळी अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर घर, दुकाने व कार्यालयांच्या साफसफाईबरोबरच सजावटीला वेग आला आहे. दिवाळीनिमित्त बहुतांश ठिकाणी घरांमध्ये रंगकाम करून गृहसजावट केली जाते. मात्र, यंदाही पेंट्स व्यावसायिकांना म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गणेशचतुर्थी, दसरा आणि आता दिवाळी हंगामही थंडावलेलाच दिसत आहे.
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे म्हणत यंदाची दिवाळी मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यासाठी नागरिक दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. विशेषकरून घर, कार्यालय आणि दुकानांच्या साफसफाईबरोबर रंगरंगोटीही केली जात आहे. या काळात पेंट्सची मागणी वाढलेली असते. मात्र गतवर्षापासून सण-समारंभांतील हंगामावरच परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षात पेंट्स दुकानदार मोठय़ा अडचणीत सापडले. मात्र आता सण-समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील निर्बंध हटविल्याने पेंट्स (रंग) ची काही प्रमाणात मागणी वाढत आहे. दिवाळी सणाला दि. 2 नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे घर, मंदिरे, दुकाने व कार्यालयांच्या स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटीसाठी लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्यानिमित्ताने काही विशेष रंगांचा वापर सजावटीसाठी केला जातो. मात्र यंदा गतवर्षाप्रमाणे मागणी कमी आहे. मात्र निर्बंध हटल्याने येत्या काळात पेंट्स व्यवसाय पूर्वपदावर येईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.
दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठही साजली आहे. त्यामुळे खरेदीची लगबग सुरू झालेली पहायला मिळत आहे. मात्र शहरातील पेंट्सच्या दुकानांमध्ये म्हणावी तशी ग्राहकांची वर्दळ पहायला मिळत नाही. कोरोनापूर्वी सण-उत्सव व दिवाळीनिमित्त मोठय़ा प्रमाणात पेंट्सची खरेदी होत होती. मात्र मागील वर्षांपासून पेंट्सचा व्यवसाय थंडावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने गवंडी, सेंट्रींग आणि पेंट्सचे काम करणारे कामगार आता हळूहळू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पेंट्स खरेदीला तुरळक प्रमाणात मागणी वाढत आहे.
अद्याप म्हणावी तशी पेंट्सना मागणी नाही
कोरोनामुळे मागील वर्षापासून मार्केट थंड आहे. गतवषी गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळीचा हंगाम पूर्ण वाया गेला होता. तसेच यंदादेखील म्हणावी तशी पेंट्सना मागणी नाही. कोरोनाआधी दिवाळी सणात रंगांच्या खरेदीसाठी गर्दी व्हायची. मात्र आता किरकोळ प्रमाणात ग्राहक येत आहेत. मात्र येत्या पाच-सहा महिन्यांत पेंट्स दुकानांतील व्यापार पूर्वपदावर येईल, अशी आशा आहे.
-सुधीर चौगुले (पेंट्स असोसिएशन-अध्यक्ष)
समारंभांवरील निर्बंध हटल्याने लवकरच पेंट्सना मागणी वाढेल
कोरोनापूर्वी घर, कार्यालये व दुकाने रंगविण्यासाठी दिवाळीत मोठय़ा प्रमाणात वेगवेगळय़ा पेंट्सना मागणी वाढायची. मात्र अद्याप मागणी म्हणावी तशी वाढली नाही. मागील आठवडय़ाभरापासून काही प्रमाणात ग्राहक येत असले तरी पूर्ण क्षमतेने खरेदी होत नाही. त्यातच मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. सध्या सण, उत्सव, समारंभांवरील निर्बंध हटल्याने येत्या दिवसांत पेंट्सना मागणी वाढेल.
-आर. आय. पाटील ( सौंदर्या पेंट्स)