आठ महिन्यानंतर बाजारला उभारी
प्रतिनिधी / बेळगाव
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवाळी पाडवा आणि भाऊबहिणीचे नाते घट्ट करणारी भाऊबिज यामुळे सोमवारी खरेदीसाठी बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल दुकाने, दुचाकी – चारचाकी वाहने खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती. तसेच फ्लॅटच्या चाव्या व नव्या जागेची कागदपत्रे घेण्यासाठी उत्साह दिसून आला. दर चढे असले तरी सोने खरेदीसाठी सुवर्णपेढय़ा फुलून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. पाडव्याच्या मुहूर्तावर बेळगावमध्ये कोटय़ावधी रूपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळी पाडव्याला नविन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. वर्षभर बचतीतून पैसे साठवून घरासाठी, स्वतासाठी नविन वस्तू खरेदी केल्या जातात. मागील आठ महिन्यांमध्ये आर्थिक बजेट कोलमडलेले असले तरी नोकरदारांचा बोनस जमा झाल्यामुळे खरेदीचा उत्साह दिसून आला. लॉकडाऊनपासून प्रथमच बाजारात खरेदीसाठीचा इतकी गर्दी दिसून आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी भरघोस अशी सुट दिली होती. खरेदीवर कॅश बॅक सोबतच गिफ्ट व्हाऊचर देण्यात येत होते.
दिवाळी संपताच लग्नाच्या मुहुर्तांना सुरू होते. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी केले जात होते. सोन्या सोबतच चांदी व हिऱयाच्या दागिन्यांना मागणी होती. सोमवारी सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 300 तर चांदीचा दर प्रति किलो 64 हजार 900 इतका होता. दर वाढलेले असतानाही सोने खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे दिसुन आले.
शुन्य टक्के फायनांन्सवर खरेदी
इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीवर शुन्य टक्के फायनान्स दिले जात होते. यामुळे खरेदी करणाऱयांना साहित्य खरेदी करणे सोयीचे ठरत होते. ग्राहकांना आधार कार्ड, बँक पासबुक व धनादेश घेऊन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करता येत होती. याचबरोबर बँकांनी गृह कर्जाच्या दरात कपात केल्यामुळे घर खरेदी तेजीत होती.
यामुळे सोमवारी किर्लोस्कर रोड, गणपतगल्ली, मारूती गल्ली, खडेबाजार, शहापूर, वडगाव, टिळकवाडी या परिसरात रात्री उशीरापर्यंत खरेदीसाठीची लगबग दिसुन आली. आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा दिवाळीमुळे बाजारात तेजी दिसून आली. यामुळे कोटय़वधी रूपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.