स्वदेशी आकाश कंदील व पणत्यांनी बाजारपेठ सजली
वार्ताहर/ कराड
अवघ्या 13 दिवसांवर आलेल्या दिवाळी सणासाठी कराडची बाजारपेठ सजली असुन कोरोनाचा जोर ओसरल्याने लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे प्रतिवर्षी दिवाळीच्या तोंडावर बाजारात दिसणारे चायनिज आकाश कंदील पणत्या व अन्य सजावटीचे साहित्य यावर्षी बाजारपेठेतून गायब झाले आहे. स्वदेशी आकाश कंदील, पणत्या, लाईटच्या माळा, तारण व अन्य सजावटीच्या साहित्याने कराडची बाजारपेठ सजली आहे.
दिवाळी असो अथवा गणेशोत्सव प्रत्येक सणाला बाजारपेठेत चायनिज वस्तूंचा पगडा दिसत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी डोकलाम मुद्यावरून भारत व चीन सिमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून बहुतांश भागात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यातच भारत-चीन देशामध्ये होणाऱया घडामोडींमुळे चिनी वस्तूंना नागरिकांची नापसंती आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेतून चायनिज वस्तू गायब झाल्याचे दिसत आहे. व्यापाऱयांनीच चायनिज वस्तू विक्रीसाठी ठेवल्या नाहीत. ग्राहकही चायनिज वस्तूंकडे पाठ फिरवत आहेत. चायनिज साहित्य नसल्याने स्वदेशी आकाश कंदील व पणत्यांना चांगली मागणी वाढली आहे.
खरेदीसाठी गर्दी
कराड तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. दिवाळीला अद्याप तेर दिवस अवकाश असला तरी दिवाळीच्या तोंडावर होणारी गर्दी लक्षात घेता बहुतांश लोकांनी आतापासूनच दिवाळीची खरेदी सुरू केली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लोक सहकुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. कोरोनाचा जोर ओसरला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱया नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. व्यापाऱयांनीही एकाचवेळी दुकानात गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन व्हावे, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.