घटनेमुळे परिसरात खळबळ : तीन दुचाकी जळून खाक : शाहूपुरी, दिव्यनगरीत रात्रगस्तीची मागणी
प्रतिनिधी / सातारा
शाहूपुरी ते दिव्यनगरी रस्त्यावर असलेल्या शिवकृपा कॉलनीत पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या चार दुचाकी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना दि. 25 रोजीच्या रात्री घडली. यामध्ये 50 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार अनिल जोसेफ तडाखे (वय 45, रा. शिवकृपा कॉलनी, माळवाडी ते दिव्यनगरी रस्ता) व त्यांच्या शेजारी राहण्यास असलेल्या अनंता हरिभाऊ पानसरे, प्रसाद देशपांडे यांनी जंगम यांच्या घराच्या पार्किंगमध्ये दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 बीजे 155), मोपेड (क्रमांक एम. एच. 11 बीवाय 9457) व होंडा दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 एए 6759) या पार्क केलेल्या होत्या.
दि. 25 रोजी मध्यरात्री अज्ञातांनी या दुचाकी पेटवून दिल्या. हा प्रकार लक्षात आल्यावर आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये 50 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक पवार अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सध्या शाहूपुरीसह दिव्यनगरी, आंबेदरे रस्ता या परिसरात काही मद्य युवकांचे ओपन बार भरत आहेत. हे युवक पिल्यानंतर सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याने नागरिकांना त्रास होत असून या परिसरात पोलिसांनी रात्रगस्त सुरु करावी, अशी मागणी होत आहे.