तहसीलदारांना निवेदन : समस्या दूर करण्याची ग्वाही
प्रतिनिधी / सावंतवाडी:
दिव्यांगांसाठीची अंत्योदय योजना, संजय गांधी पेन्शन योजना विलंब आणि ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर या विषयासंदर्भात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमधून दिव्यांगांना मिळत नसलेल्या मदतीसंदर्भात दिव्यांग सेनेकडून तालुकाध्यक्ष बाबाजी पास्ते यांनी तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन दिले.
तहसीलदार म्हात्रे यांनी दिव्यांगांच्या अंत्योदय योजनेच्या समस्यांसंदर्भात पुरवठा अधिकाऱयांना आदेश काढून संबंधित कार्यालयाकडून दिव्यांगांना मदत करण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. संजय गांधी पेन्शन योजनेसंदर्भात शासनाकडून वेळेत अनुदान मिळत नसल्यामुळे दिव्यांगांना पेन्शनसाठी वाट पाहत राहावी लागत असल्याने तहसीलदारांनी दिलगिरी व्यक्त केली. दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी होत असलेल्या त्रासाबद्दल लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन केले जाईल. तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण सदैव मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दिव्यांग सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाबाजी पास्ते, उपाध्यक्ष विशाल लातये, सचिव योगेश धुरी, सहसचिव संभाजी सावंत तसेच आधार दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित जाधव, सचिव अमित गोडकर, सहसचिव सुरेश राणे, खजिनदार आबिद शेख, दिव्यांग सेना कारिवडे गाव अध्यक्ष प्रशांत गावडे, उपाध्यक्ष रुजाय गोम्स, माडखोल अध्यक्ष दिलीप माडखोलकर, तांबुळी अध्यक्ष नागेश सावंत-भोसले, सदस्य प्रभाकर गावडे, अमोल राऊळ, अनिकेत राऊळ, महादेव रेडकर, शिल्पा जाधव, रामा राऊळ उपस्थित होते.