आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन कार्यक्रमात मागणी
प्रतिनिधी/ पणजी
दिव्यांगांच्या 21 प्रकारांपैकी 10 प्रकारांना सरकारने अद्याप प्रमाणित केलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. या प्रकरणी सरकारने त्वरित लक्ष घालून सदर प्रकारांनाही प्रमाणित करावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून करण्यात आली आहे.
कारितास गोवा या संस्थेतर्फे पणजीतील पियेदाद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर हॉस्पिसियोतील डीईआयसीच्या प्रकल्प अधिकारी वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. आयरा आल्मेदा, दिव्यांग हक्क संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा आणि कारितासचे संचालक फा. मावरिक फर्नांडीस उपस्थित होते.
2016च्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार सध्या 21 दिव्यांग प्रकार आहेत. पूर्वी ते 7 होते. परंतु सध्यस्थितीत सरकारकडे केवळ 11 प्रकारांवरच उपचार करण्याची सुविधा आहे. त्यामुळे उर्वरित 10 प्रकारातील दिव्यांगांवर अन्याय होत आहे. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. सदर प्रकारांना मान्यता द्यावी अशी गेल्या 4 वर्षांपासून सरकारदरबारी मागणी करण्यात येत आहे, परंतु अद्याप पूर्तता होत नाही. या प्रकाराची वेळीच दखल घेऊन सरकारने उर्वरित 10 दिव्यांग प्रकारही प्रमाणित करावे, अशी मागणी करण्यात आली.
राज्यात सध्या सुमारे 45 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑझिलो, हॉस्पिसियो, गोमेकॉ आणि मानसोपचार इस्पितळ या चार ठिकाणी सुविधा आहेत. मात्र तेथे केवळ 11 प्रकारांवरच उपचार होतात. उर्वरित प्रकारांचा समावेश करण्याच्या दृष्टीने सरकार कोणत्याही हालचाली करत नाही. तसेच त्यांना अन्य सेवा सुविधाही देण्यात येत नाहीत. शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळत नाही. अनेकांना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसेही 4 ते 5 महिने मिळत नाहीत. कोरोना काळात तर असंख्य दिव्यांगांचे प्रचंड हाल झाले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
रक्त ट्रान्सफ्युशन करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांचे तर प्रचंड हाल होत आहे. आरोग्य खात्याने ही सुविधा उपलब्ध न केल्यामुळे रुग्णांना फार लांब जाऊन ते उपचार करून घ्यावे लागतात. यावर उपाय म्हणून पूर्णवेळ दिव्यांग आयुक्तालय स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली.
प्रारंभी डॉ. आयरा यांनी ’राज्यातील दिव्यांगांचे सशक्तीकरण आणि सांभाळ’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यावेळी त्यांनी हॉस्पिसियोतील डीईआयसी प्रकल्पात चालणाऱया कामाचीही माहिती दिली.
आवेलिनो डिसा यांनी राज्यातील एकूण दिव्यांगांच्या विषयाचा आढावा घेताना त्यांना सतावणाऱया समस्या, अडचणी यासारख्या अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. याच कार्यक्रमात संस्थेच्या विशेष पॅलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. फा. फर्नांडीस यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.