७७ दिव्यांगाना पायाभूत सुविधांच्या साहित्यांचे वाटप
वारणानगर / प्रतिनिधी
दिव्यांगाना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यानी केले. कोडोली ता. पन्हाळा येथे रोटरी ग्रामसेवा केंद्र, वारणा परिसर आणि निर्माण सामाजिक संस्था, कोडोली यांच्या वतीने आज रविवार दि. २ रोजी सर्वोदय सोसायटी हॉलमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाना पायाभूत सुविधांच्या साहित्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच दिव्यांगावर मात करून एमबीबीसच्या वैद्यकीय शिक्षणास शासकीय गहाविद्यालयात प्रवेश मिळवलेल्या बोरीवडे ता. पन्हाळा येथील सुजाता पोपट पोवार हिचा विशेष सत्कार व ७७ दिव्यांगाना व्हीलचेअर, कृत्रीम हात, कृत्रीम पाय, श्रवण यंत्र या पायाभूत साहित्याचे वाटप तसेच कोडोली उपजिल्हा रुग्णालयास व्हीलचेअर प्रदान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक अमोल गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र व राज्य शासन स्तरावर दिव्यांगाना मिळणारा निधी खर्च होत आहे शासन दिव्यांगाना ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार उपलब्द करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच दिव्यांगाना आता घरी बसून देखील मतदान करता येणार आहे असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यानी सांगून शाहू महाराजानी सर्व घटकांसाठी काम करून देशासमोर जो आदर्श निर्माण केला आहे त्याला अनुसरून दिव्यांगाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्वच संस्थानी एकत्र येवून काम करावे. अशा संस्थाना शासन देखील मदत करेल असे सांगीतले. तर केंद्रस्तरावर दिव्यांगासाठी असणाऱ्या योजनांचा देखील लाभ दिव्यांगाना मिळबून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक अमोल गवळी यानी दिले.
रोटरी ग्रामसेवा केंद्राचे अध्यक्ष जयदीप पाटील यानी उपस्थितांचे स्वागत करून रोटरीच्या चार वर्षातील कामाचा आढावा घेतला यावेळी रोटरी ग्रामसेवा केंद्राचे मार्गदर्शक युवा उद्योजक विशाल जाधव यानी दिव्यांगाना मदत करण्यास येणाऱ्या अडचणी तसेच त्यांना रोजगार उपलब्द करून देण्यासाठी चालवलेले प्रयत्न याची माहिती दिली. रोटरीचे डिस्ट्रीक्ट चीफ असिस्टंट गव्हर्नर सचिन झंवर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष सचिन मालू, सेक्रेटरी दिव्यराज वसा, रो. गिरीष लिमडा यांच्या हस्तेही साहित्य वाटप व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे, पन्हाळा पंचायत समितीच्या माजी सभापती गीतादेवी पाटील, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड मंडल अधिकारी अभिजीत पवार, तलाठी अनिल पोवार, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम, प्रा. दयानंद देवमोरे, यासह सर्वच मान्यवरांचा सत्कार रोटरी केंद्रांच्या वतीने करण्यात आला.
रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे प्रोजेक्ट चेअरमन सतीश पाटील, प्रविण बजागे, प्रकाश सुर्यवंशी, डॉ. शामप्रसाद पावसे, प्रविण पाटील, पराग गोडबोले, अमोल पाटील, विशाल बुगले, यासह निर्माण सामाजिक संस्था व रोटरी वारणा केंद्राच्या सदस्यानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. प्रा. धनंजय र्गिरी यानी सूत्रसंचलन तर सचिव कृष्णात जमदाडे यानी आभार मानले.