प्रतिनिधी / कुदनूर
जगभरात कोरोना विषाणूने दहशत माजविली आहे. या दहशतीमुळे अनेक शहरे आणि गावे धास्तावली आहेत. याशिवाय अनेक व्यवसायही ठप्प झाले असून, अर्थकारणही तितकेच कोलमडले आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढा सर्वांनी गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे. हे गांभीर्य लोकांना पटावे आणि सर्वजण कोरोनापासून मुक्त व्हावे, या उद्देशाने कालकुंद्री येथील अपंग तरुण देवेंद्र कांबळे याने कोरोना विरोधात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
आपल्या हाताने हे जीवघेणे संकट ओढवू नका. हे आनंद शिंदे यांनी गायिलेले गीत सुरेल आवाजात सकाळी आणि सायंकाळी कानावर पडत आहे. दुचाकीला साकारण्यात आलेल्या ध्वनीयंत्रणेसह गावच्या चौकांमध्ये आणि गल्ली – बोळांमध्ये जाऊन देवेंद्र हा अपंग तरुण आपल्या सुरेल आवाजात कोरोनावर तयार केलेली गीते गाऊन कोरोनाबाबत जनजागृती करत आहे. कोरोना हा विषाणू किती घातक आहे याची माहितीही तो लोकांना देत आहे.
त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, तो उत्कृष्ट ढोलकीपट्टू आणि कलाकार आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून तो कोरोना विरोधात जनजागृतीची मोहीम गावोगावी राबवत आहे. त्याच्या या मोहिमेचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे. मी एक छोटासा कलावंत असून पोलीस, डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवा देणारे सर्वजण कोरोना विषाणूच्या विरोधात अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या कार्यात माझ्यासारख्या छोट्या कलावंताचा हातभार लागावा म्हणून मी ही सेवाभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.