प्रथमच लेझर शो चेही आयोजन : नेत्रदीपक आकर्षक रांगोळय़ा
प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी नेत्रदीपक असा दीपोत्सव करण्यात आला. कपिलेश्वर मंदिरासोबत बाजूच्या गणपती विसर्जन तलावावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नेत्रदीपक काढण्यात आलेल्या रांगोळय़ा, त्यामध्ये दिव्यांची केलेली सजावट यामुळे हा संपूर्ण परिसर उजळून निघाला. या ठिकाणी प्रथमच लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते. हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
विसर्जन तलावाच्या प्रत्येक पायरीवर दिव्यांची सुंदर अशी आरास करण्यात आली होती. हजारो दिव्यांनी हा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. हा संपूर्ण दीपोत्सव पाहण्यासाठी बेळगाव परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. दीपोत्सवाचे उद्घाटन बेळगाव मनपाच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व लक्ष्मीकांत वाधवा यांच्या हस्ते करण्यात आले.
आकर्षक रांगोळय़ांनी मंदिर परिसर फुलला
दीपोत्सवानिमित्त कपिलेश्वर मंदिर परिसरात रविवारी सकाळपासूनच भव्य अशा आकर्षक रांगोळय़ा घालण्यात आल्या. एकाहून एक सुंदर रांगोळय़ा काढण्यात आल्याने त्या पाहण्यासाठी महिला वर्गाची गर्दी झाली होती. या रांगोळय़ांमध्ये फुलांच्या पाकळय़ांची सजावट करण्यात आली होती. या रांगोळय़ांमध्ये दिवे प्रज्वलित करण्यात आल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता.