काणकोणातील काँगेस व गोवा फॉरवर्डचे नेते, कार्यकर्त्यांची मागणी, कंपनीच्या सरव्यवस्थापकांना निवेदन
प्रतिनिधी /काणकोण
राजबाग, तारीर येथील दि ललित रिसॉर्ट या तारांकित हॉटेलमध्ये स्थानिक कामगारांना तृतीय दर्जाची वागणूक दिली जात आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आलेली नाही. परराज्यांतील कामगार ज्या क्षमतेचे काम करतात तेवढय़ाच क्षमतेचे काम स्थानिक कामगार करत असताना त्यांच्या वेतनात वाढ करण्यात येत नसल्याचा दावा करून काँग्रेस आणि गोवा फॉरर्डच्या कार्यकर्त्यानी दि ललित रिसॉर्टचे सरव्यवस्थापक जेरॉम फिलीप यांची भेट घेतली आणि त्यांना स्थानिक कामगारांना योग्य न्याय देण्यासंबंधीचे निवेदन सादर केले. त्यापूर्वी प्रकल्प संचालक मार्टीन्स यांचीही शिष्टमंडळाने भेट घेऊन कामगारांच्या समस्या सादर केल्या.
दि ललित रिसॉर्टमध्ये मागच्या 18 वर्षांपासून काम करणारे कामगार असून देखभाल, निरीक्षण, रूम बॉय, स्वच्छता, बागकाम, सुरक्षारक्षक यासारखी हलक्या दर्जाची कामे या कामगारांना देण्यात येत आहेत. त्यातील कित्येक जण कुशल व आपल्या क्षेत्रात प्रशिक्षित असूनही शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात नाही, असा दावा काँग्रेसचे जनार्दन भंडारी आणि गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 2006, 2007, 2011, 2017, 2019, 2020, 2021 या प्रत्येक वर्षी कामगारांच्या समस्या घेऊन आपण कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाकडे निवेदन सादर केलेले आहे. प्रत्येक वेळी कंपनीने या निवेदनांना केराची टोपली दाखविली, असा आरोप त्यांनी केला.
75 टक्के रोजगार स्थानिकांना हवा
काणकोणच्या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर यावे लागले आणि कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, असा इशारा भंडारी आणि नाईक यांनी दिला. काणकोणात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवहार चालतो त्या प्रत्येक ठिकाणी 75 टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्र युवकांना देण्यात यावा अशी आपली मागणी आहे. प्रत्येक वेळी सादर केलेल्या मागण्यांचा ज्या पद्धतीने विचार करायला हवा होता त्या पद्धतीने झालेला नाही. यापुढे हे चालणार नाही, असा इशारा भंडारी यांनी दिला.
काणकोणातील काँग्रेस व गोवा फॉरवर्डचे प्रमुख कार्यकर्ते आबेल बोर्जिस, गास्पार कुतिन्हो, क्लेस्टन व्हिएगश, सिद्धार्थ म्हाळशी, संदीप गावकर आणि अन्य 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कंपनीच्या नियमांनुसार आणि हॉटेलात येणाऱया ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी चार ते पाच कार्यकर्त्यांशी बोलण्याची तयारी सरव्यवस्थापक फिलीप यांनी दर्शविली आणि चर्चेस मान्यता दिली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी याबाबतीत चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट पेंले.
दि ललित रिसॉर्टमध्ये 70 पेक्षा अधिक स्थानिक कामगार विविध विभागांत कामाला असून मागच्या 18 वर्षांपासून त्यांच्या वेतनात वाढ झालेली नाही, अशी समस्या काही कामगारांनी यावेळी मांडली. मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे त्यातील बऱयाच जणांना कामांवरून कमी करण्यात आले होते. सध्या कोरोना महामारी आटोक्यात आलेली असून ज्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते त्यातील काही जणांना परत टप्प्याटप्प्याने कामावर घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सध्या जे निवेदन देण्यात आले आहे ते कंपनीच्या प्रमुखांकडे पाठविण्यात येईल, असे फिलीप यांनी सांगितले.