साळगाव पोलीस निरीक्षकाची कारवाई
प्रतिनिधी /म्हापसा
साळगाव येथे घरमालकाच्या घराच दीड लाखाची चोरी करून गोव्याबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या सातारा महाराष्ट्र येथील भूषण जितेंद्र जाधव (24) याच्या साळगाव पोलिसांकडून चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान संशयित भूषणच्या ताब्यातील रियेल्म कंपनीचा महागडा मोबाईल संच, महिंद्रा बँकेचे एटीएम कार्ड तसेच महिंद्रा कंपनीच्या अलिशान गाडीची चावी आणि रोख रक्कम मिळून अंदाजे दीड लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याची माहिची साळगावचे पोलीस निरीक्षक मिलींद भूइंबर यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, मुळ परळ-मुंबई येथील परंतु सध्या ग्रेंड मरड साळगाव येथे वास्तव्यास असलेल्या दिलजान नेविल वाडीया (48) यांनी साळगाव पोलिसात सोमवारी सायंकाळी या चोरीसंबंधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत साळगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक मिलींद भूईंबर यांनी उपनिरीक्षक उल्हास खोत, सहाय्यक निरीक्षक अनिल केरकर, शीपाई संदेश आरोसकर, विजय पाळणी तसेच भगवंत गवंडी यांच्या सोबतीने त्वरित कारवाई करताना सावंतवाडा- मांद्रे येथील एका खासगी हॉटेलमधून संशयित भूषण जाधवला तो तेथून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान संशयित जाधवच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व वस्तू तसेच 77 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
साळगाव पोलीस स्थआनकाचे सहाय्यक निरीक्षक अनिल केरकर, निरीक्षक मिलींद भुईंबर तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.