‘4-जी मुबारक’ ट्विटने ओमर अब्दुल्लांनी केले स्वागत
श्रीनगर
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये राज्यातील इंटरनेट सेवा स्थगित केली होती. तब्बल दीड वर्षानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नंदनवन’ म्हणून ओळख असलेल्या संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये 4-जी भ्रमणध्वनी इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी या निर्णयाची माहिती दिली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘4-जी मुबारक’ असे ट्विट केले आहे.
राज्यात यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांपूर्वी प्रशासनाने काश्मीरमधील गंडेरबल आणि जम्मूतील उधमपूर येथे ऑगस्ट 2020 मध्ये पोस्टपेड भ्रमणध्वनीवर ही सेवा पुन्हा सुरू केली होती. दहशतवादी संघटना केंद्रशासित प्रदेशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने अन्य जिल्हय़ांमध्ये 2-जी सेवाच उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये 4-जी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.