आरोग्य तपासणीची प्रक्रिया सुरू : अहवाल येईपर्यंत बोटीवरच वास्तव्य
प्रतिनिधी / वास्को
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे विदेशात अडकलेल्या सुमारे दीड हजार गोमंतकीय नागरिकांचे काल गुरूवारी सकाळी मुरगांव बंदरात आगमन झाले. सेलेब्रिटी इन्फिनिटी या पर्यटक जहाजातून हे प्रवासी दाखल झाले असून सर्व प्रवासी गोमंतकीय आहेत. सध्या या प्रवाशांचे वास्तव्य जहाजातच असून कोविड चाचणीसाठी त्यांच्या लाळेचे नमुने गोळा करण्यात येत आहेत.
विदेशात विविध ठिकाणी अडलेले 1450 गोमंतकीय प्रवासी या जहाजात आहेत. हे प्रवासी मुरगाव बंदरात दाखल होणार असल्याने बंदरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. धक्क्यावरच एमपीटीने केलेल्या व्यवस्थेच्या आधारे प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. ही तपासणी पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतरच थोडय़ा थोडय़ा प्रवाशांना मुक्त करण्यात येणार आहे. एखादा प्रवासी कोविड पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आल्यास त्याला हॉस्टिपलमध्ये भरती करण्यात येईल. कोरोना मुक्त असल्याचे दिसून आल्यास त्याला क्वारंटाईनसाठी पाठवण्यात येईल. तपासणी अहवाल येईपर्यंत या प्रवाशांना जहाजातच राहावे लागणार आहे.
जर्मनीहून हवाईमार्गे 284 प्रवासी दाखल
हॅमबर्ग जर्मनी येथून 284 प्रवासी घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमानही काल गुरूवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. कतार एअरवेज क्यूआर 9110 या विमानातून हे प्रवासी उतरले. यात गोमंतकीय खलाशांचाही समावेश होता. हे सर्व प्रवासी भारतीय असून ते लॉकडॉऊनमुळे विदेशात अडकले होते. या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना कदंब बसमधून उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी पाठविण्यात आले आहे.